भारत आणि चीनच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये सोमवारी सहाव्या फेरीची कॉर्प्स कमांडर स्तरावरील बैठक पार पडली. तब्बल १३ तास चाललेल्या या मॅरेथॉन बैठकीतून ठोस तोडगा निघू शकलेला नाही. पण  सीमेवर तणाव आणखी वाढवायचा नाही, यावर दोन्ही बाजूंचे एकमत झालं. यापुढे फॉरवर्ड भागांमध्ये आणखी सैन्य तैनाती करायची नाही असं या बैठकीत ठरलं आहे.

मंगळवारी संध्याकाळी संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं. त्यामध्ये यापुढे तणाव वाढवायाचा नाही असं दोन्ही बाजूंमध्ये एकमताने ठरलं आहे. चीनच्या कृतीवर बरचं काही अवलंबून असेल. कारण प्रत्येकवेळी चीनने दगाबाजी केल्यामुळे सीमेवर तणावाची स्थिती आहे. चीनच्या बोलण्यामध्ये आणि कृतीमध्ये फरक असतो.

१४ कॉर्प्सचे प्रमुख लेफ्टनंट जनरल हरींदर सिंह आणि दक्षिण शिनजियांग मिलिट्री डिस्ट्रीक्टचे प्रमुख मेजर जनरल लियू लीन यांच्यात तब्बल १४ तास चर्चा झाली. पण एप्रिलमध्ये होती तशी, ‘जैसे थे’ स्थिती करण्याबाबत कोणताही ठोस तोडगा निघू शकलेला नाही. चिनी सैन्य फिंगर आठ पासून फिंगर चार पर्यंत आले आहे. तिथून ते मागे हटायला तयार नाहीत. त्यामुळे पँगाँग सरोवराच्या भागात तणाव आहे.

मागच्या काही दिवसात इथे गोळीबाराच्या तीन घटना घडल्या आहेत. ४५ वर्षात पहिल्यांदाच इथे गोळीबार झाला. पँगाँग सरोवराच्या उत्तर किनाऱ्याजवळ तर १०० ते २०० गोळयांच्या फैरी झाडण्यात आल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले होते. या भागात स्फोटक स्थिती आहे. एखादी छोटीशी ठिणगीही मोठया संघर्षाला कारणीभूत ठरू शकते. हा तणाव कमी करण्यासाठी पावलं उचलायची हेच या बैठकीत ठरलं आहे.