News Flash

चीनला निर्णायक इशारा, भारताने बजावलं लक्ष्मण रेषा ओलांडू नका अन्यथा…

"चीनला युद्ध हवे असेल तर, त्यांना सुद्धा त्याची जबर किंमत चुकवावी लागेल"

भारताच्या फायटर जेटसमधील हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्र चीनचा एअर डिफेन्स मोडून काढतील. एकदा का एअर डिफेन्स सिस्टिमची ताकत संपली की, मग तोपखान, रॉकेट सिस्टिमला सहज लक्ष्य करता येऊ शकते.

नियंत्रण रेषेजवळील चीनच्या दादागिरीवर भारतीय सैन्याने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. पूर्व लडाखमध्ये चीनने लक्ष्मण रेषा ओलांडली तर, चोख प्रत्युत्तर देण्यात येईल असा इशारा भारताने दिला आहे. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली. उंचावरील या युद्धक्षेत्रामध्ये भारतावर दबाव टाकण्यासाठी चीनकडून आक्रमक पद्धतीने सैन्य तैनाती केली जाते. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानेही फॉरवर्ड पोझिशन्सवरील आपली स्थिती आणखी बळकट केली आहे.

चुशूल सेक्टरमध्ये मुखपरी टॉपजवळ सोमवारी ४५ वर्षात पहिल्यांदाच गोळीबार झाला. त्यानंतर भारताकडून हा इशारा देण्यात आला. आज गुरुवारी मॉस्कोमध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीवरही बरेच काही अवलंबून आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्याजवळ २९-३० ऑगस्टच्या रात्री चीनने एकतर्फी नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न केला होता. जो प्रयत्न भारतीय सैन्याने हाणून पाडला व भारताच्या स्पेशल फ्रंटियर फोर्सने रणनितीक दृष्टीने महत्त्वाच्या दक्षिण किनाऱ्याजवळच्या टेकडया ताब्यात घेतल्या. तेव्हापासून चीनची दादागिरी आणि आक्रमकता वाढली आहे.

भारतानेही आतापर्यंत चीनचा घुसखोरीचा एकही डाव यशस्वी होऊ दिलेला नाही. “चीनला युद्ध हवे असेल तर, त्यांना सुद्धा त्याची जबर किंमत चुकवावी लागेल” असे भारतीय अधिकाऱ्याने सांगितले. जशास तसं उत्तर म्हणून चीन याच क्षेत्रातील दुसरे अन्य उंचावरील भाग आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करु शकतो. पण भारताने सुद्धा ग्राऊंड लेव्हलवर तैनात असलेल्या आपल्या कमांडर्सना परिस्थितीनुसार प्रत्युत्तर देण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. आपले सैन्य उंचावरील क्षेत्रात शस्त्रास्त्रांसह पूर्णपणे सज्ज आहे. रेचिन ला च्या रिजलाइनजवळ आपणही रणगाडे आणून ठेवले आहेत असे या अधिकाऱ्याने सांगितले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2020 3:56 pm

Web Title: lac stand off india will retaliate in case china breaches red line dmp 82
Next Stories
1 मध्य प्रदेश : करोनासंदर्भातील नियमांचे उल्लंघन करत भाजपाने आयोजित केल्या कलश यात्रा; FIR दाखल
2 “ही तुम्हाला शेवटची संधी,” कर्जफेड स्थगितीवरुन सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला सुनावलं
3 नोकरी मिळत नसल्याने नवविवाहित दाम्पत्याची आत्महत्या, एका महिन्यापूर्वीच झालं होतं लग्न
Just Now!
X