रेल्वेची प्रवासी सेवा अंशत: पूर्ववत झाल्यानंतर ज्या काही गाडय़ा पहिल्या टप्प्यात दिल्लीत आल्या त्यातून आलेल्या प्रवाशांचे अतोनात हाल झाले आहेत. टाळेबंदी काळात रेल्वेने येथे आल्यानंतर त्यांना घेऊन जाण्यासाठी कुठलीच वाहतूक सुविधा नसल्याने लोकांना रेल्वे स्थानकालगतच्या परिसरातील रस्त्यांवर अडकून पडावे लागले.

रेल्वेने मंगळवारपासून विशेष रेल्वे सुरू केल्या. त्यातील अहमदाबाद, पाटणा, मुंबईच्या गाडय़ा येथे दाखल झाल्या. बुधवारी सकाळी या गाडय़ा आल्यानंतर प्रवासी बाहेर पडले पण त्यांना त्यांच्या इच्छित ठिकाणी पोहोचवण्यासाठी कोणतीही वाहतुकीची सोय करण्यात आली नसल्याने ते अडकून पडले.

रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्व प्रवाशांची सक्तीने तपासणी करून त्यांना हँड सॅनिटायझर देण्यात आले. रेल्वेचा प्रवास वातानुकूलित असल्याने चांगला झाला असला तरी या लोकांना दिल्लीत आल्यानंतर बस, रिक्षा, टॅक्सी  काहीच उपलब्ध नव्हते. अनेक प्रवासी जड सामान घेऊन रेल्वे स्थानकाबाहेर उभे होते. काहींनी स्थानिक कॅब चालकांना पटवण्याचा प्रयत्न केला.

रूरकी येथे जाण्यासाठी एकाने कॅब चालकाला सहा हजार रुपये देण्याची तयारी दर्शवली. विष्णू हा पत्नी व मुलासह अहमदाबादला साबरमती स्थानकावर आला तेव्हा त्याला टेम्पो चालकास अठराशे रुपये द्यावे लागले. दिल्लीत आल्यानंतर त्यांना पश्चिम दिल्लीतील रवीनगर भागात जाण्यासाठी कुठलेच वाहन नव्हते.

अहमदाबाद येथून आलेल्या अविरल माथूर यांनी सांगितले की, रेल्वे चालवायच्याच होत्या तर निदान सार्वजनिक वाहतूक काही प्रमाणात सुरू ठेवायला हवी होती. खासगी टॅक्सी मिळणेही कठीण आहे.

अन्न खरेदीसाठी गर्दी

अहमदाबाद येथून सुटलेली रेल्वे बुधवारी नवी दिल्लीला पोचली. या गाडीमध्ये जेवणाच्या वेळी खानपान विभागात प्रवाशांची एकच झुंबड उडाली. प्रत्यक्षात रेल्वेने नवीन नियम जाहीर करताना म्हटले होते की, सर्वानी अन्न व पाणी घरूनच आणावे. पण अनेक प्रवाशांनी घरून अन्नपाणी आणलेले नव्हते. त्यामुळे बिस्किट, फरसाण, चॉकलेट्स तसेच पाण्याच्या बाटल्या घेण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडाल्याने सामाजिक अंतराचा निकष बाजूला पडला. खानपान विभागापासून दूर असलेल्या डब्यांमध्ये जे बसले होते त्यांना अन्न पाणी मिळण्यात अडचणी आल्या. मंगळवारी सायंकाळी साबरमती रेल्वे स्थानकावरून सुटलेल्या गाडीत रात्रीच्या वेळी लोकांनी अन्न पाण्यासाठी रांगेने यावे असे आवाहन करण्यात आल्यानंतर बी -१ डब्याजवळच्या खानपान विभागासमोर मोठी रांग लागली होती. अनेकांनी पाण्याच्या बाटल्या घेण्यासाठी गर्दी केल्यानंतर शेवटी रेल्वेच्या डब्यात फिरून बाटल्या विकत देण्यात आल्या.