पूर्व लडाखमध्ये झालेल्या चकमकीमुळे भारत आणि चीनमध्ये सध्या तणाव सुरु असून यादरम्यान भारतीय हवाई दलाने केंद्र सरकारसमोर एक महत्त्वाचा प्रस्ताव मांडला आहे. हवाई दलाने ३३ रशियन लढाऊ विमाने खरेदी करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर केला आहे. यामध्ये २१ Mig-29 आणि १२ Su-30MKI विमानांचाही समावेश आहे. एएनआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

“हवाई दल गेल्या बऱ्याच काळापासून या प्रस्तावावर काम करत होतं. पण आता त्यांनी प्रक्रियेत गती आणली आहे. यासाठी एकूण सहा हजार कोटींचा खर्च येईल असा अंदाज आहे. हा प्रस्ताव पुढील आठवड्यात होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीत संरक्षण मंत्रालयासमोर संमतीसाठी सादर केला जाणार आहे,” अशी माहिती सरकारी सुत्रांनी दिली आहे.

या प्रस्तावात १२ Su-30MKI विमानांचाही समावेश करण्यात आला आहे. हवाई दलाची अनेक विमानं वेगवेगळ्या अपघातात दुर्घटनाग्रस्त झाली असून त्यांची जागा ही विमानं घेतील अशी माहिती देण्यात आली आहे. भारत रशियाकडून २१ MiG 29 लढाऊ विमानं खरेदी करण्याच्या तयारीत आहे. रशियाने भारतीय हवाई दलाला भारताला या विमानात अपेक्षित असणाऱ्या सर्व सुविधा देण्याचं आश्वासन दिलं आहे.

भारतीय हवाई दलातील वैमानिकांनी Mig 29 चं उड्डाण केलं असून त्यांना याची माहिती आहे. पण रशियाने ज्या विमानांची ऑफर दिली आहे ती भारतीय विमानांपेक्षा वेगळी आहेत.

लडाखमध्ये भारतीय आणि चिनी सैन्यांमध्ये झालेल्या चकमकीत २० भारतीय जवान शहीद झाले असून चीनचे जवळपास ४० हून अधिक जवान ठार तसंच गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे सध्या दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण आहे. चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरु आहे, मात्र अद्याप त्यात यश आलेलं नाही.