मागच्यावर्षी लडाखमध्ये सीमावाद सुरु झाल्यापासून भारत आणि चीनमध्ये आतापर्यंत लष्करी चर्चेच्या नऊ फेऱ्या झाल्या आहेत. लडाखमधील आव्हानाचा विचार करता, भारताने तिथे मोठया प्रमाणावर सैन्य तैनाती केली आहे. “पूर्व लडाखमधून सैन्य माघारी संदर्भात भारत आणि चीनच्या वरिष्ठ लष्करी कमांडर्समध्ये आतापर्यंत अनेक बैठका झाल्या आहेत आणि ही कोंडी फुटत नाही, तो पर्यंत चर्चा सुरु राहिल” असे जयशंकर यांनी सांगितले.

जयशंकर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आपले समकक्ष चीनचे परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्र्यांसोबत चर्चा केली आहे. पण त्यातून फार मोठी प्रगती साध्य झालेली नाही. आतापर्यंत झालेल्या चर्चेतून जमिनीवर बदल दिसून आलेला नाही, असे जयशंकर यांनी विजयवाडा येथे पत्रकारांना सांगितले. “सैन्य माघारीचा विषय हा खूप जटिल मुद्दा आहे. हे सैन्यावर अवलंबून आहे. तुम्हाला तुमची भौगोलिक स्थिती आणि तिथे काय घडतय याची माहिती असली पाहिजे. हे सर्व लष्करी कमांडर्सच ठरवतील” असे जयशंकर यांनी सांगितले.

सीमेवर दोन्ही देशाच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीमुळे मंत्रीस्तरावर चर्चा होणार का? या प्रश्नावर जयशंकर यांनी हे उत्तर दिले. मागच्यावर्षीच्या पाच मे पासून दोन्ही देशांमध्ये पूर्व लडाख सीमेवर वाद सुरु आहे. मागच्यावर्षीच्या घडामोडींनंतर लडाखमध्ये निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आपण मोठया प्रमाणावर सैन्य तैनाती केल्याचे जयशंकर यांनी सांगितले. दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत लष्करी आणि कुटनितीक पातळीवर चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत, पण आतापर्यंत त्यातून काहीही ठोस निष्पन्न झालेले नाही.