News Flash

लडाखमध्ये चीन दोन पावलं तर भारत एक पाऊल मागे

बैठकीआधी दोन्ही देशांकडून नरमाईचे संकेत

संग्रहित छायाचित्र

चीनच्या कुरापतखोर स्वभावामुळे मागच्या काही दिवसांपासून लडाखमध्ये नियंत्रण रेषेवर तणाव निर्माण झाला आहे. पूर्व लडाखच्या काही भागांमध्ये दोन्ही देशांचे सैनिक आमने-सामने उभे ठाकले आहेत. चीनने इथे मोठया प्रमाणात सैन्याची तैनाती सुद्धा केली आहे. पण आता दोन्ही बाजुंनी थोडी नरमाईची भूमिका घेतली आहे.

नियंत्रण रेषेवर संघर्षाची स्थिती असलेल्या एका भागामध्ये दोन्ही देशांचे सैनिक थोडे मागे हटले आहेत. गालवान व्हॅलीमध्ये चिनी सैन्य दोन किलोमीटर तर भारतीय सैनिक एक किलोमीटर मागे हटले आहेत. इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

येत्या सहा जूनला दोन्ही देशांच्या लेफ्टनंट जनरलमध्ये चर्चा होणार आहे. त्यापूर्वी थोडे नरमाईचे संकेत देण्यात आले आहेत. पूर्व लडाखमध्ये निर्माण झालेल्या तणावावर मार्ग काढण्यासाठी या बैठकीत चर्चा होईल. आतापर्यंत झालेल्या सर्व बैठका निष्फळ ठरल्या आहेत. चीनने नियंत्रण रेषेवर मोठया प्रमाणात सैन्याची जमवाजमव करुन ठेवली आहे तसेच चीनच्या फायटर विमानांचा सरावही या भागामध्ये सुरु असतो. भारतावर दबाव वाढवण्याच्या चीनच्या रणनितीचा हा भाग आहे.

भारताने आतापर्यंत प्रत्येक वेळी चीनच्या या दादागिरीला त्याच भाषेत उत्तर दिले आहे. भारताकडून १४ कॉर्प्सचे लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंह चिनी लेफ्टनंट जनरल बरोबर चर्चा करणार आहेत. भारतीय लष्करातील सूत्रांनी ही माहिती दिली. पँगाँग टीएसओ तलावाचा भाग या चर्चेमध्ये मुख्य मुद्दा असेल. तलावाजवळच्या फिंगर फोर एरियामध्ये चिनी सैन्याने तळ ठोकला आहे.

नेमका वाद काय आहे ?
चीनच्या दादागिरी, वर्चस्व गाजवण्याच्या सवयीमुळे पूर्व लडाखमध्ये तणाव निर्माण झाला आहे. भारत आपल्या हद्दीमध्ये रस्ता बांधणीचे काम करतोय. पण ते चीनला मान्य नाही. त्यावरुन हा वाद सुरु झाला आहे. पॅनगॉंग टीएसओ तलावाच्या उत्तरेला भारताकडून रस्ता बांधणीचे काम सुरु आहे. त्यावर चीनने आक्षेप घेतला आहे. चीन दावा सांगतो तिथून बऱ्याच लांब अंतरावर हे काम सुरु आहे. चीनने त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागामध्ये रस्ता बांधला मग, आम्ही आमच्या भागामध्ये रस्ता बांधू शकतो अशी भारताची भूमिका आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2020 8:44 am

Web Title: ladakh standoff slight retreat by indian chinese troops at galwan valley dmp 82
Next Stories
1 अमेरिकेत महात्मा गांधींच्या पुतळयाची विटंबना
2 रेल्वेमंत्री गोयल यांच्या राजीनाम्याची मागणी
3 चिनी विमान कंपन्यांना अमेरिकेत बंदी
Just Now!
X