अवैध पद्धतीने १४ हजार लाडू विकले

नवरात्रीच्या ब्रह्मोत्सवामध्ये तिरुपती बालाजीच्या मंदिरात १४ हजार लाडवांची अफरातफर झाल्याचे वृत्त आहे. या लाडवांचा शोध घेण्यात येत असून मंदिराच्या चौकशी समितीकडून विक्रेत्यांची चौकशी करण्यात येत आहे.

नवरात्रीच्या निमित्ताने भाविकांसाठी लाडवांचा प्रसाद ठेवण्यात आला होता आणि त्यासाठी १०० रुपये आणि ५० रुपयांचे कुपनही देण्यात आले होते. भाविकांकडून कुपन घेऊन विक्रेते त्यांना लाडू देत होते. मात्र काही विक्रेत्यांनी कुपनच्या झेरॉक्स प्रती काढल्या आणि लाडू पळविले व मंदिराच्या बाहेर दुप्पट किमतीला विकले. या प्रकाराची माहिती मंदिर समितीला मिळाली. त्यानंतर मंदिर समितीने चौकशी केली असता तब्बल १४ हजार लाडवांची अफरातफर झाल्याची बाब समोर आली. या प्रकरणी संबंधित विक्रेत्यांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.