News Flash

विकृतपणाचा कळस, वीर्य भरलेला फुगा विद्यार्थिनीवर फेकला

सोशल मीडियावर हा किस्सा पोस्ट केला

विद्यार्थिनीसोबत झालेल्या या प्रकारामुळे महिला महाविद्यालयाच्या परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्यात आली.

दिल्लीमधील अमर कॉलनी मार्केट परिसरात अत्यंत चीड आणणारा प्रकार घडला आहे. होळीला अवघा एक दिवस उरला असताना महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर वीर्य भरलेले फुगे फोडण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मुलीनं सोशल मीडियावर हा किस्सा पोस्ट केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे.

लेडी श्रीराम महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीनं इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा संपूर्ण धक्कादायक प्रकार शेअर केल्यानं अनेक सामाजिक संस्थांनी संबधीत व्यक्तीला शोधून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ही विद्यार्थिनी अमर कॉलनी मार्केट परिसरात आपल्या काही मैत्रिणींसोबत गेली होती. संध्याकाळी घरी परतत असताना तिच्यावर याच परिसरातून नेम धरून फुगे मारण्यात आले. ‘ माझ्या दिशेनं फुगा मारण्यात आला. तो माझ्या अंगावर फुटला. पण, यात पाणी नसून काहीतरी वेगळंच असल्यानं मला जबरदस्त धक्का बसला. कारण कोणीतरी वीर्य फुग्यात भरून ते माझ्या दिशेनं फेकलं होतं. माझ्या काळ्या कपड्यांवर ते उठून दिसत.’ असं या मुलीनं इन्स्टाग्राम अकाऊंवर लिहीत घडलेला प्रकार आणि फोटो शेअर केले.

ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं अनेकांनी अशा विकृत मानसिकता असलेल्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ‘पिंजरा तोड’ या संस्थेनं या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत निषेध मोर्चा काढण्याचं ठरवलं आहे. ‘बुरा ना मानो होली है’ ही एक ओळ बोलून अनेकांची मनमानी चालते, कित्येक महिलांचे विनयभंग केले जातात पण , यापुढे हे खपवून घेतले जाणार नाही, म्हणूनच ‘बुरा क्यो ना मानो?’ या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.

विद्यार्थिनीसोबत झालेल्या या प्रकारामुळे महिला महाविद्यालयाच्या परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्यात आली असल्याची माहिती महाविद्यालयच्या विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा अमिता यादव हिनं इंडियन एक्स्प्रेसला दिली आहे. होळींच्या काळात मुलींवर निशाणा साधून फुगे मारण्याचे किंवा छेड काढण्याचे प्रकार वाढले आहे. म्हणूनच त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची गस्त परिसरात वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर पोलिसांनी दिलेले फोन नंबरही विद्यार्थिनींना देण्यात आले असल्याचं अमितानं सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2018 11:21 am

Web Title: lady shri ram college student claims hit by semen filled balloon
Next Stories
1 कांचीपूरम पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचे निधन
2 जाणून घ्या काय आहे आयएनक्स मीडिया प्रकरण?, का झाली कार्ती चिदंबरमवर कारवाई ?
3 मी कधी मित्र धर्म सोडला नाही पण…चंद्राबाबू नायडूंचा भाजपाला इशारा
Just Now!
X