तैवानने आणि चीनमधील संबंध मागील काही काळापासून कमालीचे ताणले गेले आहेत. त्यातच आता तैवानचे उपराष्ट्रपती लाइ चिंग टे यांनी चीनला थेट शब्दांमध्ये इशारा देत आपली मर्यादा ओलांडण्याची चूक करु नका असं म्हटलं आहे. चीनची विमाने अनेकदा तैवानच्या हवाई हद्दीचे उल्लंघन करताना दिसत आहे. हे असंच सुरु राहिलं तर याचे वाईट परिणाम होतील असं तैवानने म्हटलं आहे. चीनची लढाऊ विमाने मागील काही आठवड्यांमध्ये तीन वेळा तैवानच्या हवाई हद्दीत घिरट्या घालून आली आहेत. याच पार्श्वभूमीवर आता तैवानने चीनला थेट इशारा दिला आहे.

तैवानचे उपराष्ट्रपती लाइ चिंग टे यांनी ट्विटवरुन चीनला इशारा दिला आहे. “चीनने आज (गुरुवारी) पुन्हा तैवानच्या एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोनमध्ये आपले फायटर जेट उडवले. त्यांनी स्वत:ची मर्यादा ओलांडू नये. त्यांनी अशाप्रकारची कोणतीही चूक करु नये की ज्यामुळे शांतता भंग होईल. तैवानला शांतताच हवी आहे मात्र आम्ही आमच्या लोकांना वाचवणार,” असं लाइ चिंग टे यांनी ट्विटवर म्हटलं आहे. तैवानने बुधवारी आणि गुरुवारी चीनची विमानं त्यांच्या हवाई क्षेत्रामधून उड्डाण करताना पाहिल्याचे म्हटले आहे. चीन या प्रकारच्या गोष्टींमधून दक्षीण चीन समुद्रच्या पट्ट्यातील क्षेत्रीय शांतता आणि स्थैर्य भंग करण्याचा प्रयत्न करत आहे. याचे गंभीर परिणाम होऊ शकतात असंही तैवानने म्हटलं आहे.

गुरुवारी तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सविस्तर माहिती न देता केवळ चीनविरोधात आपले सैन्य लढाईसाठी तयार असल्याचे संकेत दिले. आमच्या लष्कराचे चीनच्या फायटर जेटवर बारीक लक्ष आहे. तसेच जशास तसे उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत असंही तैवानने स्पष्ट केलं आहे. दोन कोटी ३० लाख लोकसंख्या असणारा तैवान हा आपलाच प्रदेश असल्याचा दावा चीन करतो. लष्करी बळाच्या मदतीने या क्षेत्रावर आमचाच ताबा असल्याचा दावा चीनने अनेकदा केला आहे. चीनच्या या खुरापतींमुळे या क्षेत्रात अशांतता असल्याचे तैवानचे म्हणणे आहे. संपूर्ण जगाने एकत्र येऊन चीनला यासंदर्भात उत्तर द्यावे असंही तैवानने म्हटलं आहे

महिन्याभरापूर्वी चीनच्या फायटर जेटने तैवानच्या खाडीमध्ये आंतरराष्ट्रीय हवाई सीमांचे उल्लंघन करत प्रवेश केला होता. तैवानच्या या विमानांच्या हलचालींची नोंद आम्ही केली आहे असं म्हटलं होतं. तैवानने या घटनेचा आक्षेप नोंदवला होता. अमेरिकेनेही मागील आटवड्यामध्ये आपले गाइडेड मिसाइल्स डेस्ट्रॉयर तैवानच्या खाडीमध्ये तैनात केले आहेत. अमेरिकेने कोणतीही पूर्व सूचना न देता हे पाऊल उचललं आहे.