केरळमधील ऐतिहासिक ‘मारू मरक्कल’ चळवळीच्या खंद्या पुरस्कर्त्यां लक्ष्मीकुट्टी अम्मा यांचे सोमवारी रात्री निधन झाले. त्या १०२ वर्षांच्या होत्या. त्यांच्यामागे तीन कन्या आणि दोन पुत्र असा परिवार आहे.
वेलूर जिल्ह्य़ातील ‘वेला’ या पारंपरिक उत्सवात सहभागी व्हायचे असेल तर मंदिरात प्रवेश करताना खालच्या जातीतील महिलांनी आपल्या छातीवर वस्त्रे नेसू नयेत, असा चमत्कारिक आदेश तत्कालीन जमीनमालकांनी काढला होता आणि महिलांना अत्यंत कमीपणा आणणाऱ्या या चालीविरोधात लक्ष्मीकुट्टी यांनी १९५२ पासून मोठा लढा द्यायला सुरुवात केली होती. जमीनमालकांच्या या ‘आदेशा’चा भंग करणाऱ्या अशा महिलांना कडक शिक्षेसही तोंड द्यावे लागत असे. लक्ष्मीकुट्टी यांनी या रानटी प्रथेविरोधात ‘मारू मरक्कल’ (छातीवर वस्त्रे नेसण्याचा हक्क) चळवळीद्वारे जोरदार आवाज उठविला आणि त्यामुळेच ती प्रथा मोडीत निघाली. वझनी धरणातील कालव्याच्या उभारणीप्रसंगी मजुरांच्या होणाऱ्या पिळवणुकीविरोधातही लक्ष्मीकुट्टी यांनी १९४८ मध्ये आंदोलन छेडले होते.
लक्ष्मीकुट्टी या अविभक्त कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्या होत्या. नंतर त्या मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षात गेल्या.