आयपीएलचे क्रिकेट स्पर्धेतीत आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप असलेल्या ललित मोदी यांना मदत केल्याने खुर्ची संकटात सापडलेल्या राजस्थानच्या मुख्यमंत्री वसूंधरा राजे यांचे दबावतंत्र भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर भारी पडले आहे.
राजे यांना राजीनामा देण्याची सक्ती केल्यास त्यांच्या समर्थक आमदारांनी राजस्थान सरकार अस्थिर करण्याची भीती दाखविल्यानेच शहा यांनी आपली तलवार म्यान करीत राजे यांची बाजू मांडण्याचे निर्देश पक्ष प्रवक्त्यांना दिले. शुक्रवारी सकाळी पंजाबचा निर्धारित दौरा रद्द करून राजे यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेण्याचे टाळले होते. पंजाबमध्ये राजे व शहा एका कार्यक्रमात एकत्र येणार होते. दिवसभरातील नाटय़मय घडामोडींनंतर पक्ष प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी वसूंधरा राजे यांना निदरेष ठरवीत त्या राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले. तर कोणत्याही परिस्थितीत राजे यांची गच्ंछती झालीच पाहिजे, अशी आक्रमक भूमीका काँग्रेसने घेतली. याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही, इतक्या स्पष्ट शब्दात जयराम रमेश यांनी भाजपला इशारा दिला.
ललित मोदी प्रकरणाचे पडसाद पावसाळी अधिवेशनात उमटण्याच्या भीतीने भाजपचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे राजे यांचा राजीनामा  घेण्यावर अमित शहा ठाम होते. परंतु १६३ पैकी तब्बल नव्वद टक्के  राजे समर्थक आमदारांनी शहा यांना न जुमानल्याने राजे यांची पाठराखण करण्याची पाळी भाजप नेत्यांवर आली.
सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, ललित मोदी यांच्याविरोधातील प्रकरण संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळाती आहे. त्यावर ते इतके दिवस गप्प का होते? त्याउलट सुषमा स्वराज वसुंधरा राजे यांनी ललित मोदी यांच्याशी असलेली कौटुंबिक मैत्री कधीही लपवलेली नाही. स्वराज यांच्याविषयी पक्षाने यापूर्वीच आपली बाजू भक्कमपणे मांडली आहे.

भेट टाळली
वसुंधरा राजे यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट टाळली आहे. पंजाबमधील एका कार्यक्रमात राजे उपस्थित राहणार होत्या, मात्र आजारपणाचे कारण देत त्यांनी या कार्यक्रमास न जाणे पसंत केले.