आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील सट्टेबाजी प्रकरणातील आरोपी ललित मोदी यांची मदत केल्यामुळे राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची खुर्ची संकटात सापडली आहे. ललित मोदी यांच्यासाठी ब्रिटनमधील खासदाराशी पत्रव्यवहार केल्याने विरोधकांचे लक्ष्य झालेल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचा बचाव करणाऱ्या भाजपने वसुंधरा राजे यांना एकाकी पाडले आहे.
राजे यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न न करण्याचे आदेश भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी पक्ष प्रवक्त्यांना दिले आहेत. ललित मोदी यांना मानवतेच्या भावनेतून मदत केल्याचे स्पष्टीकरण स्वराज यांनी दिले होते. त्यानंतर भाजप व सरकार स्वराज यांच्या पाठिशी उभे राहिले. राजे यांनी या प्रकरणी अद्याप स्वतची बाजू मांडलेली नाही. हे प्रकरण लवकर न शमल्यास आंतरराष्ट्रीय योगा दिवसाची सांगता होताच राजे याांन राजीनामा देण्यास सांगण्यात येईल, अशी शक्यता भाजप सूत्रांकडून वर्तविण्यात आली आहे. ललित मोदी प्रकरणामुळे नरेंद्र मोदी वसुंधरा राजे यांच्यावर अत्यंत नाराज असल्याचे समजते.