बिहारमध्ये चित्रपटांवर प्रेम करणाऱ्या नेत्यांची कमतरता नाही. आता यामध्ये आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव यांचा पुत्र आणि बिहारचे माजी आरोग्य मंत्री तेजप्रताप यादव यांचेही नाव जोडले गेले आहे. तेजप्रताप लवकरच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची खेळी करताना दिसतील. हिंदी चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवत असलेल्या तेजप्रताप यांनीच याबाबत ट्विट करत चित्रपटाचे पोस्टरचीही माहिती दिली.

आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून तेजप्रताप यांनी चित्रपटाचे एक छायाचित्र शेअर केले आहे. छायाचित्रात तेजप्रताप यांच्या चित्रपटाचे नाव हे ‘रुद्रा द अवतार’ असे दिसते. चित्रपटाच्या नावाखाली ‘कमिंग सून’ असे लिहिले आहे. बॅकग्राऊंडला तेजप्रताप यांचा काळा चष्मा घातलेला दिसून येतो

नुकताच तेजप्रताप यादव यांच्या लग्नाची मोठी चर्चा झाली होती. स्वत:ला रूद्र अवतार सांगत भगवान शंकर यांच्या जागेवर त्यांना दाखवण्यात आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. त्यांना बासरी वाजवण्याचा छंद आहे. यापूर्वी २०१६ मध्ये त्यांनी एका भोजपुरी चित्रपटातही छोटीशी भूमिका केली होती.

दरम्यान, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचा मुलगा चिरागने अभिनय क्षेत्रात नशीब आजमावून पाहिले आहे. २०११ मध्ये त्यांनी ‘मिले न मिले हम’ या चित्रपटांत प्रमुख भूमिका निभावली होती. अभिनय क्षेत्रात अयशस्वी ठरल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता.