बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांचा आरोप

 पाटणा : राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन चारा घोटाळ्यातील खटले सौम्य करण्याच्या बदल्यात बिहारमधील महाआघाडी सरकार पाडून तेथे भाजपचे सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता, असा गौप्यस्फोट बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी केला आहे.

पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले, की जेटली यांनी प्रसाद यांना या प्रस्तावावर कानपिचक्या दिल्या. लालूप्रसाद यादव यांनी स्वत: जेटली यांची भेट घेतली होती शिवाय माजी केंद्रीय मंत्री प्रेमचंद गुप्ता यांनाही प्रस्ताव मांडण्यासाठी दूत म्हणून पाठवले होते.

लालूप्रसाद यादव हे नेहमीच भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात गरळ ओकत आले आहेत पण तरी चारा घोटाळा प्रकरणी खटले व कारवाई सौम्य करण्यासाठी त्यांनी जेटली यांची मदत मागितली होती. त्या वेळी सीबीआय ही स्वायत्त संस्था आहे व त्यात सरकार हस्तक्षेप करू शकत नाही, असे सांगून जेटली यांनी लालूंना खडे बोल सुनावले होते.

राज्यातील विरोधी पक्षनेते व लालूंचे पुत्र तेजस्वी यादव यांनी हा आरोप फेटाळला असून भाजपला निवडणुकीतील पराभव दिसू लागल्यानेच ते अशी विधाने करीत असल्याचे म्हटले आहे.

सुशीलकुमार मोदी यांनी सांगितले, की २०१४ मध्ये झारखंड उच्च न्यायालयाने लालूप्रसाद यांना दिलासा दिला होता. त्यांच्यावर चारा घोटाळा प्रकरणी सहा वेगवेगळे खटले चालवण्यात येऊ नयेत, एकच खटला चालवावा, असे न्यायालयाने म्हटले होते. त्या वेळी स्वतंत्र खटले चालवण्याच्या भीतीने लालूंनी त्यांचे दूत प्रेमचंद गुप्ता यांना जेटली यांच्याकडे पाठवले होते, त्या वेळी सीबीआयने निकालावर अपील करू नये किंवा सीबीआयने खटला कमकुवत करून टाकावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला होता. गुप्ता हे जेटली यांना तीन ते चार वेळा भेटले होते. पण जेव्हा त्यात यश आले नाही तेव्हा लालू स्वत: जेटली यांना भेटायला गेले पण जेटली यांनी लालूंचा देकार फेटाळून लावला होता. एकीकडे लालूंची जनता दल संयुक्तचे नितीश कुमार यांच्याशी युती होती व चारा घोटाळ्यातील खटले कमकुवत करणे किंवा त्यात कारवाई न करणे यासाठी त्यांनी बिहारमधील महाआघाडीचे सरकार पाडून तेथे भाजपचे सरकार आणण्याचा प्रस्ताव मांडला होता. भाजपचे दिवंगत नेते कैलाशपती मिश्रा यांच्या पाठिंब्यानेच लालू १९९० च्या सुमारास मुख्यमंत्री झाले. त्या वेळी त्रिशंकू विधानसभा तयार झाली. भाजपच्या ३९ आमदारांनी पाठिंबा दिल्याशिवाय लालू मुख्यमंत्री झाले नसते. लालूंचे दूत व ते स्वत: यांनी जेटली यांची भेट घेतल्याची माहिती नितीशकुमार यांचे आताचे विश्वासू व भाजपचे माजी आमदार संजय झा यांनी दिली होती, असे सुशील मोदी यांनी स्पष्ट केले.

झा यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, लालू  यांनी महाआघाडीचे सरकार २४ तासांत पाडण्याचा प्रस्ताव जेटली यांना दिला होता.

मोदींची मानसिक दिवाळखोरी- तेजस्वी यादव

लालूंनी चारा घोटाळा प्रकरणी कारवाई टाळण्यासाठी भाजपची मदत मागितली होती, असा आरोप करून सुशीलकुमार मोदी यांनी मानसिक दिवाळखोरी दाखवली असून भाजपला पराभव समोर दिसत असल्याचेच यातून दिसून येत असल्याचे तेजस्वी यादव यांनी स्पष्ट केले. लालूंनीच अडवाणींची रथयात्रा अडवली होती व त्यांनी नेहमीच जातीयतेविरोधात लढा दिला याची आठवण त्यांनी करून दिली.