हॉटेल हस्तांतरणात झालेल्या घोटाळ्याशी आपला काहीही संबंध नाही. सर्व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली आहे. सर्व काही एनडीएच्या काळात झालं. मला अडकवण्यासाठीच भाजप-आरएसएसनं कट रचला आहे. मी आणि माझा पक्ष घाबरणार नाही. मोदी आणि भाजप सरकारला हटवूनच स्वस्थ बसेन, असा निर्धार लालूप्रसाद यादव यांनी बोलून दाखवला.

देशाची अवस्था खूपच वाईट आहे. काहीही चुकीचं केलेलं नाही. मला अडकवण्याचा भाजप आणि संघाचा कट आहे, असा आरोप लालूप्रसाद यादव यांनी केला आहे. १९९९ मध्ये आयआरसीटीसीची स्थापना करण्यात आली. २००२ मध्ये काम प्रत्यक्षात सुरु झालं. २००३ मध्ये रेल्वेनं हॉटेल-प्रवासी निवासस्थान आयआरसीटीसीकडं सोपवलं. २००६ मध्ये आयआरसीटीसीनं खुली निविदा प्रक्रिया सुरू केली. सर्व नियमांनुसार केलं आहे. घोटाळ्याशी आमचा काडीमात्र संबंध नाही, असं स्पष्टीकरण लालूप्रसाद यादव यांनी दिलं.

तत्पूर्वी, सीबीआयनं शुक्रवारी माजी रेल्वेमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. लालूंसह त्यांची पत्नी राबडी देवी, मुलगा तेजस्वी आणि आयआरसीटीसीच्या तत्कालीन व्यवस्थापकीय संचालकांचा आरोपींमध्ये समावेश आहे. लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना २००६ मध्ये रेल्वेच्या मालकीचे पूरी आणि रांची येथील हॉटेल एका खासगी कंपनीला देण्यात आलं होतं. हॉटेलचा विकास करणे, देखभाल-दुरुस्ती करणे आणि चालवण्याचं कंत्राट या कंपनीला देण्यात आलं होतं. या व्यवहाराच्या मोबदल्यात संबंधित कंपनीनं पाटणा येथे दोन एकरची जागा लालूप्रसाद यादव यांच्याशी संबंधित कंपनीच्या नावावर केली होती. या संशयास्पद व्यवहाराचा सीबीआयकडून तपास सुरु होता. सीबीआयच्या पथकानं दिल्ली, पाटणा, रांची, पूरी, गुरुग्राम तसंच लालूप्रसाद यादव आणि आयआरसीटीसीचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालकांचे निवासस्थान अशा १२ ठिकाणी छापे टाकले. सीबीआयने लालूप्रसाद यादव आणि अन्य तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने गुन्हा दाखल केल्याने लालूप्रसाद यादव यांच्या अडचणीत भर पडली आहे.