बिहारी जनतेवर सलग १५ वर्षे आधिराज्य गाजवणारे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना सोमवारी अखेरीस तुरुंगात जावे लागले. हजारो कोटी रुपयांच्या चारा घोटाळाप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने त्यांच्यासह ४५ जणांना दोषी ठरवले आहे. या निकालामुळे लालू यांना तुरुंगाची हवा खावी लागणार आहेच; परंतु अलिकडेच दोषी लोकप्रतिनिधींबाबत दिलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार त्यांची खासदारकी रद्द होऊन त्यांना सहा वर्षांसाठी निवडणूक लढवणेही शक्य  होणार नाही.
गेल्या १७ वर्षांपासून चारा घोटाळा प्रकरणाची सुरू असलेली सुनावणी सोमवारी येथे सीबीआयच्या विशेष न्यायालयात संपुष्टात आली. मुख्य आरोपी लालूप्रसाद यादव, माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्र यांच्यासह इतर सहा राजकीय नेते व चार सनदी अधिकारी यांच्यासह ४५ जणांना न्यायालयाने दोषी ठरवले. दोषींमध्ये संयुक्त जनता दलाचे खासदार जगदीश शर्मा यांचाही समावेश आहे. गुरुवारी, ३ ऑक्टोबरला लालूंना शिक्षा सुनावली जाणार आहे. न्यायालयाच्या निकालानंतर लगेचच लालूंची तुरुंगात रवानगी करण्यात आली. लालू यांना दोषी ठरवण्याच्या न्यायालयाच्या निकालाचे भाजपने स्वागत केले. काँग्रेसशी असलेल्या जवळिकीचा त्यांनी गैरफायदा घेतला, असा आरोप भाजपने केला. काँग्रेसने यासंदर्भात प्रतिक्रिया देत ‘कायद्यानुसार योग्य झाले’ असे म्हटले.  
राजकीय कारकीर्द धोक्यात?
* कोणत्याही गुन्हय़ाप्रकरणी दोषी आढळलेल्या व शिक्षा सुनावण्यात आलेल्या खासदार व आमदारांना अपात्र ठरवण्याचा आदेश अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.
* सर्वोच्च न्यायालयाचा हा आदेश धुडकावून लावत केंद्र सरकारने दोषी आमदार-खासदारांना त्यांची आमदारकी-खासदारकी टिकवून ठेवता येईल, अशा प्रकारची तरतूद करून अध्यादेश राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवला होता.
* मात्र, राष्ट्रपतींनी त्यावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. तसेच काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही हा अध्यादेश फाडून फेकून देण्याचे आदेश दिल्याने अध्यादेश केंद्र सरकारकडून माघारी घेतला जाण्याचीच शक्यता जास्त आहे.
* सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करणे अपरिहार्य असल्याने लालूंची खासदारकी गेल्यातच जमा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तुरुंगातूनही लालूंना निवडणूक लढवता येणार नाही.
* सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा अभ्यास करून लालू व अन्य दोषी खासदारांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे लोकसभेच्या सभापती मीरा कुमार यांनी स्पष्ट केले.

दुखदायक
काँग्रेसचे जुने आणि विश्वासू साथीदार असलेले लालू चारा घोटाळ्यात दोषी आढळले ही दुखदायक घटना आहे. उच्च न्यायालयात ते निर्दोषत्व सिद्ध करतील याची खात्री आहे.
– दिग्विजयसिंह, काँग्रेसचे सरचिटणीस

शिक्षा किती होणार?
लालूप्रसादांना किमान तीन ते कमाल सात वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे. सीबीआय न्यायालयाच्या
या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे लालू यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी सोमवारी सांगितले.