राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानल नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. पूर्वी लोक वाघ-सिंहाला घाबरत होते. पण आता ते गायीला घाबरत आहेत. देशात पसरलेले गोरक्षक याला कारणीभूत आहेत, अशी टीका त्यांनी केली. पक्षाच्या एका बैठकीत ते बोलत होते. मोदी सरकारची ही देणगी असल्याचे सांगण्यासही ते विसरले नाहीत.

ते म्हणाले, गोरक्षकांच्या भीतीमुळे बिहारमधील सोनपूर येथील जनावरांचा बाजार गोपालकांविना भरला. सोनपूरमधील हा बाजार आशिया खंडातील सर्वांत मोठा बाजार म्हणून ओळखला जातो. आता तिथे वेगळंच चित्र आहे. लोकसभा निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात मागील साडेतीन वर्षांत मोदी सरकारला पूर्णपणे अपयश आले आहे. त्यामुळे जनता नाराज आहे.

लोक नोटाबंदी व जीएसटीमुळेही त्रस्त आहेत. मोदी २०१९ च्या आधीच म्हणजे २०१८ मध्येच लोकसभा निवडणुका घेऊ शकतात. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी तयार राहण्याच्या सूचना केल्या आहेत. जेव्हा लोकसभा निवडणुका होतील, तेव्हा विरोधी पक्ष भाजपला निश्चितच पराभूत करतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तेजस्वी आणि मिसा भारती हार्दिकच्या संपर्कात असतात, असेही ते म्हणाले. माध्यमांबाबत बोलताना ते म्हणाले, एकीकडे अमेरिकेत माध्यमं राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या चुका काढण्यात व्यस्त असतात. तर इकडे आपल्या देशात केंद्र सरकारच्या दबावात माध्यमं विरोधकांच्या चुका काढताना दिसतात. यावेळी त्यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा मुलगा जय शहा याच्याविरोधात ‘द वायर’ ने केलेल्या आरोपांचा उल्लेख केला. तसेच याप्रकरणी मानहानीचा दावा दाखल करण्याची भीती दाखवण्यात आल्याचे ते म्हणाले.