राजकारणाचा विचार केला तर ते दोघेही एकमेकांचे विरोधकच म्हणायला हवेत. पण योगविद्येमुळे ते दोघे एकमेकांच्या जवळ आले आणि त्यातूनच दोघांमध्ये मैत्रिपूर्ण संबंधही निर्माण झाले. बिहारमधील राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेले लालूप्रसाद यादव आणि योगगुरु रामदेव बाबा यांच्यातील वाढत्या मैत्रीमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्यास आश्चर्य वाटायला नको.
दिल्लीमध्ये योगविद्या शिकवण्यासाठी लालूप्रसाद यादव यांनी रामदेव बाबांना निमंत्रित केले होते. त्यावेळी खुद्द लालूंनी रामदेव बाबा यांच्या पतंजली उत्पादनांचे तोंडभरून कौतुक केले. पतंजलीच्या साबणांमध्ये आमच्याच गाईंचे दूध वापरण्यात येते, असेही लालूंनी यावेळी सांगून टाकले. त्याचबरोबर बाजारात मिळणाऱ्या इतर साबणांमध्ये मोठ्या प्रमाणात सोडा असतो. पण पतंजलीच्या साबणांमध्ये अजिबात सोडा नसतो. या साबणामुळे तुमच्या त्वचेवर कोणताही दुष्परिणाम होत नाही, असेही त्यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी पतंजलीच्या उत्पादनांमध्ये हाडांचा भुगा वापरला जातो, अशी एक चर्चा सुरू झाली होती. तीसुद्धा लालूप्रसाद यादव यांनी फेटाळली आहे. अशी चर्चा घडवून आणण्यामागे कटकारस्थान असल्याचा आरोप लालूंनी केला.
यावेळी रामदेव बाबा यांनी त्यांच्या गोल्ड क्रीममधील थोडे क्रीम लालूंच्या गालावर लावले. लालू यांनी ते हसतमुखाने लावून घेत रामदेव बाबांचे पुन्हा कौतुक केले.