राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची प्रकृती खालावली आहे. सध्या त्यांनी रांचीमधील आरआयएमएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रकृती बिघडल्यानंतर गुरुवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या बऱ्याच काळापासून लालूप्रसाद यादव यांना अनेक व्याधींचा त्रास होत आहे. प्रकृती खालावल्यानंतर लालूप्रसाद यांची मुलगी मिसा भारती रुग्णालयात पोहोचली आहे.

दरम्यान लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव आणि पत्नी राबडी देवी चार्टर्ड विमानाने पाटणा येथून रांचीसाठी निघाले आहेत. रुग्णालयाचे संचालक कामेश्वर प्रसाद यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, “लालूप्रसाद यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाला आहे. आम्ही एम्स रुग्णालयाच्या संपर्कात आहोत. त्यांची करोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. आरटी-पीसीआर रिपोर्ट उद्या येईल”.

“जिथपर्यंत आम्हाला माहिती आहे त्यांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. अजून काही चाचण्या केल्या जात आहेत. चाचण्यांचा रिपोर्ट आल्यानंतरच आम्ही सांगू शकू. मी, माझा भाऊ आणि आई रांचीला जात आहोत,” असं तेजस्वी यादव यांनी सांगितलं आहे.