रांचीतील ‘रिम्स’मध्ये उपचार घेत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांना दिल्लीतील एम्स रूग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती ढासळत चालल्याने अधिक चांगले उपचार मिळावेत या दृष्टीने रिम्समधील डॉक्टरांनी त्यांना दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला होता. लालू यांच्या फुफ्फुसात पाणी झालं असून, चेहऱ्यावर सूज आली आहे. त्यांची एक किडनीही खराब झाली आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती लालू प्रसाद यादव यांचे सुपूत्र आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी दिली होती. त्यानंतर त्यांना तातडीने शनिवारी संध्याकाळी दिल्लीच्या एम्स रूग्णालयात हलवण्यात आले.

लालू प्रसाद यादव यांच्या फुफ्फुसात पाणी, प्रकृती चिंताजनक

तुरूंगवास भोगत असलेले लालू प्रसाद यादव यांच्यावर मागील काही महिन्यांपासून रांचीतील रिम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, दिवसेंदिवस त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे. प्रकृती चिंताजनक असल्याने शुक्रवारी रात्री कुटुंबातील सदस्यांनी लालू प्रसाद यांची भेट घेतली होती. माजी मुख्यमंत्री व पत्नी राबडी देवी, सुपूत्र तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव आणि मुलगी मिसा भारती यांनी लालूंच्या प्रकृतीबद्दल डॉक्टरांशी चर्चा केली होती. लालूंना भेटण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना विशेष परवानगी देण्यात आली होती.

रिम्स रूग्णालयातून लालू प्रसाद यादव यांना दिल्लीच्या एम्समध्ये शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हलवण्यात आले. शनिवारी सायंकाळी लालू यांना रूग्णवाहिकेने बिरसा मुंडा विमानतळावर नेण्यात आले. तेथून हवाई रूग्णवाहिकेच्या मदतीने त्यांना दिल्लीला नेण्यात आले. विमानतळावर त्यांच्यासोबत त्यांची पत्नी राबडी देवी, मुलगा तेजस्वी यादव व तेजप्रताप यादव तसेच मुलगी डॉ. मिसा भारती सारेच जण हजर होते. तेथून त्यांना दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले.