बिहार, कर्नाटक, पंजाब आणि मध्य प्रदेशात झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, बिहारमध्ये लालूप्रसाद यादव, नितीशकुमार यांच्या जोडीला मतदारांनी कौल दिल्याचे चित्र आहे.
जनता दल युनायटेड, राष्ट्रीय जनता दल आणि कॉंग्रेस यांच्या महाआघाडीला बिहारमधील दहा पैकी सहा जागांवर विजय मिळवण्यात यश आले आहे. उर्वरित चार जागांवर भाजप विजयी झाला आहे. याआधी या दहा जागांपैकी सहा जागा भाजपकडे होत्या.
मुंबईत रुग्णालयात उपचार घेत असलेल्या लालूप्रसाद यादव यांनी बिहारमधील पोटनिवडणुकीच्या निकालाबद्दल आनंद व्यक्त केला. ट्विटरवर ट्विट करून लालूप्रसाद यादव यांनी आपला आनंद जाहीर केला. या विजयाबद्दल त्यांनी राज्यातील जनतेचेही आभार मानले आहेत.
मध्य प्रदेशातील तीन जागांपैकी दोन ठिकाणी भाजपचे तर एका ठिकाणी कॉंग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे. कर्नाटकमध्ये कॉंग्रेसला दोन तर भाजपला एक जागा मिळाली आहे. पंजाबमध्ये एका जागेवर कॉंग्रेसचा तर एका जागेवर शिरोमणी अकाली दलाचा उमेदवार विजयी झाला आहे.