उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाप्रमाणे लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलातही (आरजेडी) कौटुंबिक कलह निर्माण होऊ शकतो, असा दावा करणारे भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांच्यावर लालूंच्या मुलाने शेलक्या शब्दांत टीका केली आहे. सुशीलकुमार मोदी यांनी स्वत:च्या मुलाच्या लग्नाची चिंता करावी. तुमचा मुलगा नपुंसक असल्यामुळे त्याचे लग्न होत नाही का?, असा खोचक सवाल  बिहार सरकारमध्ये आरोग्यमंत्री असणाऱ्या तेज प्रताप याने विचारला आहे.
सुशीलकुमार मोदी यांनी लालूप्रसाद यादव यांच्या कौटुंबिक कलहावर भाष्य करताना तेज प्रताप यांना लक्ष्य केले होते. बिहारमध्ये सत्ता आल्यानंतर लालूप्रसाद यादव यांनी त्यांची मुलगी मिसा भारती किंवा ज्येष्ठ पूत्र तेज प्रताप यांना उपमुख्यमंत्री करणे अपेक्षित होते. मात्र, लालूंनी वरिष्ठांची परंपरा मोडीत काढून त्यांचा लहान मुलगा तेजस्वी यादवाला उपमुख्यमंत्रीपद दिले. त्यामुळे आता बिहारमध्ये लहान भाऊ बोहल्यावर चढला आणि मोठा अजूनही अविवाहीत आहे, अशी चर्चा रंगली आहे. मुलायम सिंह यांच्या घराण्यात ज्याप्रकारे वाद उफाळून आला तशाप्रकारचा स्वत:च्या कुटुंबातील वाद लालूप्रसाद यादव कधीपर्यंत रोखून धरणार आहेत, असा सवाल सुशीलकुमार मोदी यांनी विचारला होता. या टीकेला मंगळवारी तेज प्रताप यांनी उत्तर दिले. सुशीलकुमार मोदी यांनी माझ्या लग्नाची चिंता करणे सोडून द्यावे. त्यांनाही मुलगा असल्यामुळे त्यांनी प्रथम त्याच्या लग्नाचे पाहावे. त्यांचा मुलगा नपुसंक आहे का?, असे तेज प्रताप यांनी म्हटले. दरम्यान, तेज प्रताप यांचे विधान टीका त्यांच्यावरील संस्कार दाखवणारी असल्याची टीका सुशील मोदी यांनी केली आहे.
बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांना लग्नासाठी ४४ हजार मुलींच्या मागण्या
गेल्या काही दिवसांपासून बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्यांना व्हॉट्स अॅपवर जवळपास ४४ हजार मुलींनी लग्नासाठी मागणी घातली आहे अशी चर्चा आहे. याविषयी तेज प्रताप यांना विचारले असता त्यांनी, माझ्याआधी तेजस्वीचे लग्न करण्याविषयी मी माझ्या पालकांशी बोलेन, असे सांगितले.