बिहार विधानसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे(राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी आता दिल्लीवर लक्ष केंद्रीत केले आहे. लालूंना दिल्लीतील बंगल्याचे वेध लागले असून, त्यांनी आपल्या सौभाग्यवती राबडी देवी आणि कन्या मीसा भारती यांना राज्यसभेवर पाठविण्याची तयारी सुरू केल्याचे समजते. दिल्लीत थांबण्यासाठी लालूंकडे सध्या कोणताही बंगला नाही. मात्र, राबडी देवी आणि मीसा भारती राज्यसभेचे सदस्य झाल्यास दोघांनाही सरकारी निवासस्थान मिळेल.
बिहार निवडणुकीत रादजचे ८० आमदार निवडून आले. यात लालूंचे दोन पुत्र निवडून आले आणि त्यांच्यापैकी तेजस्वी यादव हे मंत्रीही आहेत. परिणामी लालूंची पत्नी व कन्येचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दोघींनाही निवडून आणण्यासाठी राजदला केवळ दोन मतांची गरज आहे. जुलै २०१६ मध्ये जदयूचे राज्यसभेतील पाच खासदारांचा कालवधी पूर्ण होत असून त्यातील दोन जागांची मागणी करून राबडी आणि मीसाला राज्यसभेवर पाठवायचे असा लालूप्रसाद यांचा उद्देश आहे. यामुळे लालूंना दिल्लीत हक्काचे घर मिळू शकेल. सध्या लालू दिल्लीत जातात तेव्हा त्यांना राजदचे खासदार प्रेम चंद गुप्ता यांच्या निवासस्थानी मुक्काम करावा लागतो.