बिहार विधानसभा निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आता सुरु झाल्या आहेत. दरम्यान, भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी शनिवारी राष्ट्रीय जनता दलाचे सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांच्यावर धक्कादायक आरोप केले. लालूंनी तीन वर्षांपूर्वी आपल्याला जादूटोण्याच्या मदतीने जीवे मारण्याचा प्रयत्न केला असं त्यांनी म्हटलं आहे.

ट्विट करीत सुशीलकुमार मोदी म्हणाले, “लालू यादव हे अंधश्रद्ध व्यक्ती असून त्यांनी मांत्रिकाच्या सांगण्यावरुन पांढरा कुर्ता घालण्याचं बंद केलं. तर शंकर चरण त्रिपाठी या मांत्रिकाला राजदचा राष्ट्रीय प्रवक्ता बनवलं. याच मांत्रकानं विंध्याचल धाममध्ये (मिर्झापूर) लालू प्रसाद यादव यांच्याकडून तांत्रिक पूजा करवून घेतली होती. तीन वर्षांपूर्वी मला मारण्यासाठी देखील त्यांनी तंत्र पूजा केली आहे.”

“लालू प्रसाद यादव यांचा जनतेवर विश्वास नाही. त्यामुळे ते तंत्र-मंत्राच्या पूजाअर्चा करीत असतात. प्राण्यांचे बळी आणि आत्म्यांची प्रार्थना करीत असतात. एवढ करुनही ते तुरुंगातून सुटू शकले नाहीत किंवा आपली सत्ता टिकवू शकले नाहीत. ते अजून १४ वर्षे तुरुंगात घालवू शकतात. लालू प्रसाद यादव यांनी तुरुंगाच्या नियमांचे उल्लंघन करीत त्यांच्या रांची येथील बंगल्यावर नवमीच्या दिवशी तीन बोकडांचा बळी दिला,” असा दावाही मोदी यांनी केला आहे.

बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या चार दिवस आधीच सुशीलकुमार मोदी यांनी लालू प्रसाद यादव यांच्यावर हे आरोप केले आहेत. या निवडणूका तीन टप्प्यात होणार असून २८ ऑक्टोबर रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तर राज्यातील २४३ मतदारसंघांचा निकाल १० नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे.