कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याविरोधात भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केलेले वक्तव्य हे अधिक प्रक्षोभक होते व जर मोदी भारताचे पंतप्रधान झाले तर प्रादेशिक शांतता धोक्यात येईल, असे मत पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षामंत्री चौधरी निसार अली खान यांनी व्यक्त केल्यानंतर आता राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी मोदींना टोला हाणला आहे.
नरेंद्र मोदींना पाकिस्तानात पाठवावे असे मत लालूप्रसाद यांनी व्यक्त केले आहे.
लालूप्रसाद म्हणतात, “पहिल्यांदा नरेंद्र मोदींनाच पाकिस्तानात पाठवा, भारतातील अंतर्गत सुरक्षा कायम राखण्यासाठी हाच एक उत्तम उपाय आहे. अशा नेत्यांमुळेच देशातील अंतर्गत सुरक्षेला आजवर धोका पोहोचलेला आहे.” असेही लालूप्रसाद यावेळी म्हणाले.
लालूप्रसादांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहनवाज हुसेन म्हणाले की, “मग लालूप्रसादांना पाकिस्तानात आधी का पाठवू नये? त्या देशात आपण लोकप्रिय असल्याचे ते सांगत असतात त्यामुळे लालूप्रसादांनाच पाकिस्तानात पाठवणे योग्य राहील. तसेत पाकिस्तानाच्या मंत्र्यांनी भारताबद्दल बोलत असताना आपली मर्यादा बाळगावी. भारतातील मुद्द्यांमध्ये नाक खुपसण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही याची जाणीव त्यांना असवी.” असे खडेबोलही हुसेन यांनी पाकिस्तानला सुनावले आहेत.