संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांनी महाआघाडीशी फारकत घेत एनडीएसोबत हातमिळवणी करून त्यांच्या पाठिंब्यावर बिहारमध्ये सरकार स्थापन केल्यानंतर संयुक्त जनता दलाचे ज्येष्ठ नेते शरद यादव नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. शरद यादव यांनी यावर अद्याप जाहीर भाष्य केले नसले तरी आरजेडीचे नेते लालूप्रसाद यादव यांनी शरद यादव यांचा मला पाठिंबा असल्याचा दावा करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. नितीशकुमार यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर शरद यादव यांचा मला फोन आला. मी तुमच्यासोबत आहे, असे त्यांनी मला फोनवरून सांगितल्याचा दावा लालूप्रसाद यांनी केला.

नितीशकुमार यांनी एनडीएसोबत जाण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्यांच्यात पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद यादव नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यांच्या नाराजीबाबत येथील राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत. तसेच यादव गेल्या काही महिन्यांपासून संसदेतही फारसे कुणाशी बोलत नसल्याचे सांगण्यात येत आहे. नितीशकुमार यांनी महाआघाडीची फारकत घेत एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्या दिवशी शरद यादव एका कार्यक्रमासाठी आले होते. नितीशकुमार यांनी निर्णय जाहीर केल्यानंतर ते लगेच तेथून निघून गेले होते.

दरम्यान, नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. काल विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. आज संध्याकाळी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. अद्याप याबाबत त्यांनी घोषणा केली नसली तरी पाटणामध्ये नितीशकुमारांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत आज संध्याकाळी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याबाबत संकेत दिले आहेत. या बैठकीत मंत्र्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे, अशी माहितीही सूत्रांकडून देण्यात आली.