ज्या व्हिडिओमुळे लष्करात सहाय्यक पद्धत चालते असे दाखवण्यात आले होते ती मुलाखत नसून ते स्टिंग ऑपरेशन होते. त्या स्टिंगमुळे रॉय मॅथ्यूचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या भावाने म्हटले आहे. क्विंट या वेबसाइटने रॉय यांचे स्टिंग ऑपरेशन केले आणि ‘सैनिक की नोकर’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध केले. यामुळे रॉय हे तणावाखाली राहू लागले. आपल्यावर कारवाई होईल अशी भीती त्यांना सातत्याने वाटू लागली. त्यातूनच त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला असावा अशी शंका त्यांची पत्नी फिनी यांनी व्यक्त केली. ज्यादिवशी त्यांचा मृत्यू झाला त्याच्या एक एक दिवस आधी त्यांनी आपल्या पत्नी आणि भावाला ही बाब बोलून दाखवली होती. क्विंटने ती बातमी काढून टाकली आहे. क्विंटशी संपर्क साधण्याचा प्रयत्न इंडियन एक्सप्रेसने केला आहे परंतु अद्याप त्यांनी उत्तर दिले नाही असे इंडियन एक्सप्रेसने म्हटले आहे.

लष्करातील सहाय्यक किंवा ‘बडी’ या पद्धतीला वाचा फोडल्यानंतर संशयास्पदरित्या मृत्यूमुखी पडलेल्या रॉय मॅथ्यू या जवानाच्या कुटुंबियांनी त्यांचे पार्थिव स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यांचा मृत्यू संशयास्पदरित्या झाला असून त्यामध्ये घातपाताची शक्यता आहे असे त्यांच्या कुटुंबियांनी म्हटले आहे. कुटुंबियांनी संशय व्यक्त केल्यानंतर आज पुन्हा नव्याने शवविच्छेदन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोल्लम जिल्ह्यातील इझुकोन येथे त्यांचे पार्थिव आणण्यात आले. ते पार्थिव स्वीकारण्यास कुटुंबियांनी नकार दिला. त्यामुळे मॅथ्यू यांच्या पार्थिव शरीराचे पुन्हा एकदा शवविच्छेदन करण्यात येणार आहे. नाशिकजवळील देवळाली कॅम्प येथे एका बराकमध्ये त्यांचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत सापडला. ही आत्महत्या असावी असा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. हा घातपाताचा प्रकार नाही असा अहवाल डॉक्टरांनी दिला. लष्करामध्ये उच्च अधिकाऱ्याची घरची कामे करणे, कार साफ करणे, कुत्र्यांना फिरायला नेणे अशी कामे जवानांना करावी लागतात असे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले होते. आपल्या अधिकारांचा गैरवापर करुन जवानांना या कामी लावतात असे त्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले होते. या व्हिडिओवरुन गदारोळ झाल्यानंतर क्विंटने तो काढून टाकला.