कलम ३७० रद्द करण्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमधील दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. काश्मीरमध्ये शनिवारपासून दूरध्वनी सेवा सुरू करण्यात आली आहे. तर जम्मूसह कठुआ, उधमपूर, सांबा, रियाशी या जिल्ह्यातील दूरध्वनी आणि २जी इंटरनेट सेवाही सुरू झाली आहे. तब्बल १२ दिवसांनंतर या सेवा पुर्ववत झाल्या असून, शाळा-महाविद्यालये सोमवारपासून सुरू होणार आहेत.

जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर पाच ऑगस्टपासून गेले १२ दिवस राज्यातील जनजीवन बंदिस्त झाले होते. तेथील र्निबधांना सर्वोच्च न्यायालयातही आव्हान देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य सचिव बी. व्ही. आर. सुब्रमण्यम यांनी शुक्रवारी श्रीनगर येथे पत्रकार परिषद घेतली होती. दहशतवादी संघटनांनी काश्मीर अशांत करण्याचा प्रयत्न केला, पण तो हाणून पाडला गेला. गेल्या १२ दिवसांत हिंसाचाराची वा जीवितहानीची एकही मोठी घटना घडलेली नाही. राज्याच्या १२ जिल्ह्यांमध्ये जनजीवन सुरळीत असून केवळ पाच जिल्ह्य़ांत रात्री किमान निर्बंध असल्याची माहितीही त्यांनी दिली होती.

शुक्रवारचा नमाजही ठिकठिकाणी शांततेत झाला. तसेच सरकारी कार्यालयांतही उपस्थिती लक्षणीय होती. आता शांतता प्रस्थापित करण्यासाठी लोक जितका पुढाकार घेतील तितके निर्बंध शिथिल होतील, अशी माहिती त्यांनी दिली होती. अतिरेक्यांना संपर्काचा लाभ घेता येऊ नये म्हणून मोबाइलसेवा पूर्ण बंद ठेवली गेली आहे. पण काही दिवसांत ती पूर्ववत होईल. दूरध्वनीसेवा मात्र शुक्रवार रात्रीपासूनच विभागवार पूर्ववत होत असून शनिवारी श्रीनगरमधील दूरध्वनी सुरू होतील, असेही सुब्रमण्यम म्हणाले होते. दरम्यान, खासगी वाहतूक मोठय़ा प्रमाणात सुरू झाली असून काही दिवसांत सार्वजनिक वाहतूकही पूर्ववत केली जाणार आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. हाज यात्रेकरूंना कोणताही अटकाव कुठेही केला जात नसून जीवनावश्यक वस्तू आणि औषधांचा पुरवठाही सुरळीत आहे.

मुख्य सचिवांच्या माहितीनंतर काश्मीर खोऱ्यातील जनजीवन पुर्वपदावर आणण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न केले जात आहे. शनिवारपासून श्रीनगरसह काश्मीरमधील दूरध्वनी सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, इंटरनेट सेवा अद्याप बंद आहे. जम्मूसह कठुआ, उधमपूर, सांबा, रियाशी जिल्ह्यांतील दूरध्वनी आणि २जी वेगाने इंटरनेट सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. तर सोमवारपासून सर्व शैक्षणिक संस्था आणि शासकीय कार्यालये सुरू होणार आहे.