इंडियन एअर फोर्सचे सामर्थ्य वाढवण्यासाठी संरक्षणाशी निगडित मंत्रिमंडळ समितीने एका महत्त्वाच्या खरेदी व्यवहाराला मंजुरी दिली आहे. इंडियन एअर फोर्ससाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून ८३ मार्क-१ ए तेजस फायटर विमाने विकत घेण्याच्या व्यवहाराला मंत्रिमंडळ समितीने मंजुरी दिली आहे. तेजस हे स्वदेशी बनावटीचे फायटर विमान आहे. तब्बल ४८ हजार कोटी रुपयांचा हा खरेदी व्यवहार आहे.

फेब्रुवारी महिन्यात करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर तीन वर्षांनी ‘तेजस मार्क-१ ए’ विमानांचा पुरवठा सुरु होईल. आयएएफने हिंदुस्तान एरोनॉटिक्सला आधीच ४० ‘तेजस मार्क १’ विमानांची ऑर्डर दिली आहे. नवे ‘तेजस मार्क-१ ए’ आधीच्या ‘तेजस मार्क १’ पेक्षा अधिक अत्याधुनिक आणि घातक असणार आहे. तेजसच्या नव्या आवृत्तीत ४३ बदल करण्यात येणार आहेत.

“भारतीय संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्याच्या दृष्टीने हा व्यवहार गेमचेंजर ठरेल” असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. “पुढच्या काही वर्षात ‘तेजस’ लढाऊ विमान भारतीय हवाई दलाचा मुख्य कणा बनेल. नव्या तेजस मध्ये अनेक नव्या टेक्नोलॉजीचा समावेश केला जाईल. ज्याचा यापूर्वी कधीही भारतात वापर झालेला नाही. LCA तेजसमध्ये स्वदेशी घटक ५० टक्के आहेत. Mk1A या आवृत्तीत हे घटक ६० टक्के असतील” असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.

नाशिक, बंगळुरुमध्ये HAL ने तेजसच्या उत्पादनाच्या दृष्टीने सुविधांची उभारणी केली आहे. चीन आणि पाकिस्तान या दोन शेजारी देशांकडून असलेले आव्हान लक्षात घेता, ‘तेजस’ची बांधणी त्या दृष्टीने करण्यात आली आहे. एकाचवेळी चीन-पाकिस्तानचा सामना करण्यासाठी भारताला ४२ स्क्वाड्रनची आवश्यकता आहे. सध्या आयएएफकडे फक्त ३० स्क्वाड्रन आहेत. प्रत्येक स्क्वाड्रनमध्ये १८ फायटर विमाने आहेत.