23 September 2020

News Flash

मुसळधार पावसामुळे केरळमध्ये भूस्खलन 

१४ ठार, ५० हून अधिक बेपत्ता

संग्रहित छायाचित्र

 

केरळमध्ये झालेल्या तुफान वृष्टीमुळे इडुक्की जिल्ह्य़ातील पेट्टीमुडी येथे भूस्खलन होऊन किमान १४ जण ठार झाले असून ५० हून अधिक जण दगडमातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन त्याखाली चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांची घरे भुईसपाट झाली, असे पोलीस आणि अधिकाऱ्यांनी सांगितले.

पावसामुळे भुसभुशीत झालेला मातीचा मोठा ढिगारा शुक्रवारी पहाटे कामगारांच्या घरांवर कोसळला आणि त्यामध्ये दोन लहान मुले आणि पाच महिलांसह १४ जण ठार झाले. मृतांमध्ये चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या बहुसंख्य कामगारांचा समावेश असून ते शेजारच्या तमिळनाडू जिल्ह्य़ातील आहेत. आतापर्यंत १२ जणांना वाचविण्यात आले असून बेपत्ता झालेल्या जवळपास ५२ जणांचा शोध घेतला जात आहे.

राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) कर्मचारी मदतीसाठी तैनात करण्यात आले असून भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात येत आहे, असे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले. पावसामुळे झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता ५१ झाली आहे. पलक्कड जिल्ह्य़ात घर कोसळून शुक्रवारी एकाचा मृत्यू झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

स्वयंपाकाची भांडीकुंडी चिखलात गाडली गेली असल्याचे आणि घरांवरील पत्रे उडून गेल्याचे चित्र घटनास्थळी दिसत होते. इडुक्कीचे जिल्हाधिकारी एच. दिनेश यांनी सांगितले की, मृतदेह बाहेर काढण्यात आले असून १२ जणांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मृतांच्या नातेवाईकांना ‘पीएमएनआरएफ’मधून मदत

इडुक्की जिल्ह्य़ात भूस्खलन होऊन १४ जण ठार झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याचे पंतप्रधानांच्या कार्यालयाने ट्वीट केले आहे. त्याचप्रमाणे जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2020 12:27 am

Web Title: landslides in kerala due to torrential rains abn 97
Next Stories
1 केरळ विमान अपघातात ठार झालेला वैमानिक महाराष्ट्राचा पुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव
2 केरळ विमान दुर्घटना : १४ जणांचा मृत्यू १२३ जण जखमी
3 एअर इंडियाचं विमान केरळच्या कोझिकोड विमान तळावर घसरलं
Just Now!
X