जगामध्ये भाषांचा इतिहास गेल्या सत्तर हजार वर्षांचा असून येत्या एक ते दोन हजार वर्षांनंतर शब्दभाषा लोप पावतील आणि प्रतिमा व रूपकांची नवी भाषा अस्तित्वात येईल, असे प्रतिपादन भाषा अभ्यासक डॉ. गणेश देवी यांनी रविवारी येथे केले.
घुमान साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या पहिल्या सत्राची सुरुवात डॉ. गणेश देवी यांच्या प्रकट मुलाखतीने झाली. सुषमा करोगल आणि अरुण जाखडे यांनी डॉ. देवी यांच्याशी संवाद साधला.
भविष्यात प्रतीकांची भाषा मोठय़ा प्रमाणात विकसित होईल. वाचेशिवाय भाषा असे त्याचे स्वरूप असण्याची शक्यता भाषा शास्त्रज्ञांना वाटत असल्याचे सांगून डॉ. देवी म्हणाले, लेखन हा प्रकार कदाचित निघून जाईल. गंभीर विषयावरील नोंदी करण्यासाठी किंवा आपले विचार व्यक्त करण्यासाठी नवीन साधने निर्माण होतील. आपल्या भाषेचे जतन आणि संवर्धन करणे हे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे. ती फक्त शासनाची जबाबदारी नाही. तर संपूर्ण समाजानेही आपले योगदान त्यासाठी दिले पाहिजे.
आपल्या भावी उपक्रमाविषयी माहिती देताना ते म्हणाले, ‘समाजातील भाषाप्रेमी, भाषातज्ज्ञ आणि समाज व शासनाच्या साहाय्याने जगातील सर्व भाषांचे सर्वेक्षण करण्याची योजना मनामध्ये आहे. उद्यावर माझा अधिकार नसला तरी स्वप्नांवर मात्र माझा अधिकार आहे.’
वसाहतवादामुळे संस्कृती दडपली गेली, आता जागतिकीकरणाचा रेटा आणि परिणाम यामुळे लोकांची भाषा मारून टाकण्याचे काम सुरू झाले आहे. मार्केटची एक नवी भाषा तयार होत आहे. जगातील सुमारे सहा हजार भाषांपकी चार हजार भाषा येत्या तीस वर्षांत मरतील, अशी भीती व्यक्त करण्यात येत असल्याचेही डॉ. देवी यांनी सांगितले.
मुलाखत संपल्यानंतर राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते डॉ. गणेश देवी यांचा सत्कार करण्यात आला.  यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरिवद गोखले यांनी संपादित केलेल्या ‘कवितांचे वेचे-नवनीत’ या ग्रंथाचे पुनप्र्रकाशन डॉ. गणेश देवी यांच्या हस्ते करण्यात आले. मोरोपंत ते ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, शेख महंमद आणि इतर संत व अन्य कवींच्या रचनांचे संकलन या पुस्तकात करण्यात आले आहे.

डॉ. गणेश देवी उवाच
*१९६१ च्या जनगणनेत १ हजार ६५२ मातृभाषांची नोंद झाली होती. पुढच्याच दहा वर्षांत म्हणजे १९७१ च्या जनगणनेत फक्त १०८ मातृभाषांची नोंद केली गेली. म्हणजे जवळपास १ हजार ५०० भाषा मरण पावल्या.
*एखाद्या व्यक्तीपेक्षा संपूर्ण समाज िहसक का बनतो याचा मी अभ्यास केला. तेव्हा असे लक्षात आले की ज्या समाजात लोभ हाच मानदंड बनतो आणि त्यालाच यशाचे गमक मानले जाते तेथे िहसा वाढत जाते. िहसेतून केवळ प्रतििहसा निर्माण होते. यातून ना समाजाचे, ना सरकारचे भले होते.
*चोरी केली की आपण एखाद्याला शिक्षा करतो, पण त्यामुळे चोऱ्या होणे काही थांबलेले नाही. मला असे वाटते की चोरी करावीशीच वाटणार नाही, असा भविष्यातील समाज निर्माण होण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावेत.
*भाषा तोडण्याचे नव्हे तर जोडण्याचे काम करते. प्रत्येक व्यक्तीने फक्त आपापल्या भाषेचा झेंडा हाती घेतला तर त्यातून संघर्ष होणे अपरिहार्य आहे.
*मराठी साहित्य भारतीय साहित्याचा उत्कृष्ट आविष्कार आहे. मराठी साहित्यातील स्त्री लेखकांचे लेखन मला अप्रतिम वाटते. दलित साहित्य अधिक भावते, तर कविता प्रकाराचा झालेला विकास अद्भुत वाटतो.

देसलडा व सहकाऱ्यांचे फोटोसेशन  
ही मुलाखत सुरू असताना अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी असलेल्या कक्षात राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे बसले होते. संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसलडा हे मुलाखत सुरू असतानाच एकेका माणसाची तावडे यांच्याशी ओळख करून देण्यासाठी घेऊन येत होते. ओळख करून दिल्यानंतर त्या प्रत्येकाचे तावडे यांच्याबरोबर छायाचित्रही काढण्यात येत होते. त्यामुळे मुलाखतीचे गांभीर्य पूर्णपणे निघून गेले.

मुलाखत रंगली नाही
डॉ. गणेश देवी यांची मुलाखत घेणारे जाखडे व करोगल हे डॉ. गणेश देवी यांचे उत्तर पूर्ण होण्यापूर्वीच नवीन प्रश्नाची सुरुवात करत होते. त्यामुळे काही वेळेस डॉ. गणेश देवी यांचा बोलण्यातील मुद्दा अर्धवट राहात होता.