लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ ईलम (एलटीटीई) या संघटनेला श्रीलंकेच्या लष्कराने २००९ मध्ये नेस्तनाबूत केले असले, तरी त्यांची आंतरराष्ट्रीय यंत्रणा शाबूत आहे त्यांना आर्थिक पुरवठाही केला जात आहे, असे अमेरिकेच्या एका सरकारी अहवालात म्हटले आहे.
परराष्ट्र खात्याच्या अहवालात म्हटले आहे, की श्रीलंकेत २०१४ मध्ये लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ ईलम या संस्थेने कुठलेही हल्ले केलेले नाहीत. श्रीलंका लष्कराने त्यांच्या देशात या संघटनेला नेस्तानाबूत केले होते पण भारत व अमेरिकेत हल्ले करण्याचा कट आखणाऱ्या एलटीटीईच्या १३ समर्थकांना २०१४ मध्ये मलेशियात अटक करण्यात आली होती.
अहवालात म्हटले आहे, की यापूर्वी एलटीटीईने श्रीलंकेतील अनेक संस्थांवर, नेत्यांवर व लष्करावर हल्ले करून जेरीस आणले होते नंतर लष्कराने त्या संघटनेला नेस्तानाबूत केले. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना १९९१ मध्ये तर श्रीलंकेचे अध्यक्ष रणसिंगे प्रेमदासा यांना ठार करण्यात एलटीटीईचा हात होता. एलटीटीईकडे ब्लॅक टायगर्स, सी टायगर्स, एअर टायगर्स अशी दले होती. २००६ मध्ये एलटीटीई विरोधात श्रीलंका लष्कराने कारवाई सुरू केली व किलीनोचीसह महत्त्वाचे भाग २००९ मध्ये परत मिळवले व एलटीटीईचा नेता प्रभाकरन याला लष्कराने ठार केले.
मार्च २०१४ च्या अहवालानुसार १६ संघटना व ४२२ व्यक्ती एलटीटीईच्या पुरुज्जीवनासाठी मदत करीत आहेत. श्रीलंका सरकारनेच ही माहिती दिली असून त्यासाठी पुरावे मात्र दिलेले नाहीत.