भारतीय मच्छीमारांच्या मानवतावादी अधिकारांचा प्रश्न परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी श्रीलंकेचे पंतप्रधान रणिल विक्रमसिंघे यांच्याकडे उपस्थित केला, पण श्रीलंकेच्या हद्दीत भारतीय मच्छीमार आले तर त्यांना गोळ्या घातल्या जातील, असे सांगून विक्रमसिंघे यांनी एक नवीन वाद निर्माण केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी पुढील आठवडय़ात श्रीलंकेला जात आहेत त्याच्या पूर्वतयारीसाठी सुषमा स्वराज यांनी श्रीलंकेला भेट दिली. भारतातील इटालियन नौसैनिक व भारतीय मच्छीमार या दोन प्रश्नांची तुलना करता येणार नाही, असे स्वराज यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान विक्रमसिंघे यांच्याशी चर्चा करताना स्वराज यांनी भारतीय मच्छीमारांचा प्रश्न मानवतावादाशी निगडित असल्याचे सांगून त्यांच्या रोजीरोटीशी त्याचा संबंध असल्याचे स्पष्ट केले.
उत्तर श्रीलंकेतील मच्छीमारांची रोजीरोटी भारतीय मच्छीमार हिरावून घेत, असा आरोप विक्रमसिंघे यांनी केला. जर कुणी माझे घर फोडायचा प्रयत्न केला तर त्याला मारले जाणार हे उघड आहे व कायद्यानुसार तसे करण्याची आपल्याला परवानगी आहे, असे स्पष्ट केले.
भारतीय मच्छीमारांना ठार करणाऱ्या दोन इटालियन नौसैनिकांवर भारताने आधी कडक कारवाई केली आहे. जर इटलीशी भारताची मैत्री आहे, तर त्यांनी आधी त्या नौसैनिकांशी मानवतावादाला धरून वर्तणूक करावी व नंतर आमच्याशी मानवतावादावर चर्चा करावी. या दोन्ही गोष्टींचा परस्पर संबंध जोडण्याचे कारण नव्हते असे भारताचे परराष्ट्र प्रवक्ते सय्यद अकबरउद्दीन यांनी सांगितले.
दरम्यान, तामिळबहुल भागातील सैन्य कालपरत्वे कमी केले जाईल, असे रणिल विक्रमसिंघे यांनी सूचित केले .  परिस्थिती सुधारल्याशिवाय लष्कर मागे घेण्यास त्यांनी नकार दिला आहे.
 ‘थांति’ या दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विक्रमसिंघे यांनी सांगितले, की श्रीलंकेतील बराच भूभाग हा सरकारच्या नियंत्रणाखाली असून त्यातील काही भाग कालांतराने लष्कराच्या वर्चस्वातून मुक्त केला जाईल.  श्रीलंकेच्या बहुतांश भागात लष्कर आहे. श्रीलंकेच्या प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी लष्कर आहे व ते मागे घेण्याचे कुठलेही कारण सध्या नाही., असे त्यांनी स्पष्ट केले.