विमान प्रवासादरम्यान भ्रमणध्वनी पेटल्याच्या घटना घडत असताना इंडिगोच्या थिरुवअनंतपुरम-बेंगळूरु या विमानात लॅपटॉपमधून धूर येत असल्याची घटना शनिवारी घडली. जळण्याचा वास येत असल्याची प्रवाशांनी तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघड झाला. यानंतर कर्मचाऱ्यांनी तातडीने आगप्रतिबंधक यंत्रणा सुरू केल्याने दुर्घटना टळली.

गो इंडिगोचे ६ई-४४५ हे विमान थिरुवअनंतपुरमहून बेंगळूरुला निघाले होते. या वेळी काळ्या रंगाच्या छोटय़ा बॅगमधून धूर येत असल्याचे एका प्रवाशाच्या निदर्शनास आले. त्याने लागलीच हवाई सुंदरीच्या ही बाब निदर्शनास आणली. तिने बॅग उघडली तेव्हा लॅपटॉपमधून धूर येत असल्याचे दिसले.

तिने ही घटना वैमानिकाला कळविली व आगरोधक स्प्रेचा फवारा मारून आग विझविली. यानंतर हा लॅपटॉप पाण्याच्या आवरणातील बॅगमध्ये ठेवण्यात आल्याचे इंडिगोच्या प्रवक्त्याने सांगितले.

डीजीसीएने वाढत्या घटनांवरून लांबच्या पल्ल्यासाठी प्रत्येक खासगी इलेक्ट्रॉनिक साहित्यासाठी आगरोधक बॉक्स अनिवार्य करण्याबाबत विचार चालविला आहे. दोन वर्षांपूर्वी एका कंपनीचा विशिष्ट भ्रमणध्वनी पेट घेत असल्याने विमानातून तो नेण्यावर बंदी आणली होती.

इलेक्ट्रॉनिक साहित्य धोकादायक

खासगी इलेक्ट्रॉनिक वस्तूंनी विमान प्रवासादरम्यान पेट घेतल्याची ही भारतातील पहिलीच वेळ नाही. महिन्यापूर्वीच अन्य एका विमान कंपनीच्या दिल्ली-इंदोर विमानामध्ये भ्रमणध्वनी पेटल्याची घटना घडली होती.

सरसकट बंदी घालण्याचा विचार

आंतरराष्ट्रीय कंपन्या विमानतळावरच प्रवासी दाखल झाल्यानंतर त्याच्याकडील बॅटरी असलेल्या मोठय़ा इलेक्ट्रॉनिक साहित्यावर बंदी आणण्याचा विचार करत आहेत. तसेच विमानातील कर्मचाऱ्यांना या साहित्याला लागलेल्या आगीवर कसे नियंत्रण मिळवावे याबाबतही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पॉवर बँक, पोर्टेबल मोबोइल चार्जर, ई-सिगारेटवर यापूर्वीच बंदी घालण्यात आली आहे.