मथुरा हिंसाचारातील बळींची संख्या २९ वर; रहिवाशांवर ४५ प्रकरणे दाखल
मथुरेतील जवाहरबाग भागात अतिक्रमणकर्ते आणि पोलीस यांच्यातील संघर्षांत बळी पडलेल्यांची संख्या २९ वर पोहोचली असून, पोलिसांनी या ठिकाणच्या रहिवाशांवर ४५ प्रकरणे दाखल केली आहेत. या स्थळावरील शोधमोहिमेत पोलिसांना रविवारी फार मोठय़ा प्रमाणावर स्फोटकांचा साठा सापडला आहे.
जखमींपैकी एक अनोळखी इसम रविवारी येथील जिल्हा रुग्णालयात मरण पावला, तर दुसरा आग्य््रााच्या रुग्णालयात मरण पावल्यामुळे बळींची संख्या २९ वर पोहचली असल्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी विवेक मिश्रा यांनी सांगितले.
अतिक्रमकांविरुद्ध ४५ प्रकरणे दाखल करण्यात येऊन त्यात ३ हजार लोकांना आरोपी करण्यात आले असल्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक राकेश सिंग म्हणाले. आझाद भारत विधिक वैचारिक क्रांती सत्याग्रही संघटनेचा प्रमुख रामवृक्ष यादव याला आर्थिक मदत व शस्त्रे पुरवणाऱ्या त्याच्या साथीदारांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. दडवलेली स्फोटके आणि शस्त्रे शोधण्याचे काम सोमवापर्यंत सुरू राहील, अशी माहिती त्यांनी दिली.
दोन महिलांसह दहा मृतांची ओळख तुरुंगातील त्यांच्या साथीदारांनी पटवली असून, इतर मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. ओळख पटवण्यासाठी नातेवाईक पुढे न आल्यास सोमवारी मृतदेहांची शवचिकित्सा करण्यात येऊन अंत्यसंस्कार केले जातील, असेही सिंग यांनी सांगितले.
दरम्यान, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवपाल यादव हे या हिंसाचारासाठी जबाबदार असल्याचा आरोप करून केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अतिक्रमणकर्त्यांना यादव यांचे संरक्षण असल्यामुळेच दोन वर्षे उलटूनही त्यांच्यावर काही कारवाई झाली नाही, असे त्या म्हणाल्या.

स्फोटकांचा साठा
जवाहरबाग भागातील शोधमोहिमेदरम्यान पोलिसांना रविवारी ५ किलो सल्फर, अडीच किलो गनपावडर, १ किलो पोटॅश, ५०० ग्रॅम छोटय़ा लोखंडी गोळ्या आणि एक इलेक्ट्रॉनिक प्लेट असा स्फोटकांचा मोठा साठा सापडल्याचे पोलीस अधीक्षक अरुणकुमार सिंग यांनी सांगितले. ही शोधमोहीम सुरू असून, न्यायसहायक चमूने तेथील काम पूर्ण करेपर्यंत या ठिकाणी कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही असे ते म्हणाले.

मृत पोलीस अधिकाऱ्यांसाठी एक दिवसाचे वेतन देणार
मथुरा : मथुरेतील जवाहरबाग भागातील हिंसाचारात मारल्या गेलेल्या दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत देण्याचा निर्धार पोलीस व राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी केला आहे. हिंसाचाराचे बळी ठरलेले पोलीस अधीक्षक मुकुल द्विवेदी आणि ठाणेदार संतोष यादव यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्यासाठी एक दिवसाचा पगार देण्याचा निर्णय सरकारी अधिकारी व कर्मचारी यांनी घेतला आहे. ही रक्कम प्रत्येकी ५० लाख रुपयांहून कमी असणार नाही, असे जिल्हा दंडाधिकारी राजेश कुमार यांनी सांगितले. जवाहरबागेला द्विवेदी यांचे नाव दिले जाईल असेही ते म्हणाले.