भारतीय जवानांना आज एलओसीवरील रामपूर सेक्टरमध्ये मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा हस्तगत करण्यात यश आले आहे. जवानांकडून या भागात राबवण्यात आलेल्या शोधमोहीमेत पाच एके 47 रायफल्स, सहा पिस्तुलं, २३ ग्रेनेड आणि जवळपास बाराशे पेक्षा अधिक काडतुसं असा मोठ्याप्रमाणवर शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला आहे.

एलओसीजवळील भागात शस्त्रं दडवून ठेवणे ही पाकिस्तानची कार्यप्रणाली असून, त्या नंतर या शस्त्रांची दहशतवादी कारवायांसाठी काश्मीरमध्ये स्मगलिंग केली जाते. अशी माहिती बारामुल्लामधील १९ व्या डिव्हिजनचे जीओसी विरेंद्र वत्स यांनी दिली.

भारतीय लष्करास मिळालेल्या गुप्त माहितीवरून, बीएसएफ, लष्करी जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीस यांच्या संयुक्त पथकाकडून सध्या शोधमोहीम राबवली जात आहे.

सीमा रेषेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. दोन दिवसांपूर्वीच पाकिस्तानी सैन्याकडून एलओसीवरील जम्मू-काश्मीरमधील नौशारा सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला होता. यास भारतीय जवानांनी देखील सडेतोड प्रत्युत्तर दिले. मात्र, यावेळी झालेल्या गोळीबारात भारतीय सैन्य दलातील नायब सुभेदार राजविंदर सिंग हे शहीद झाले होते.