चेन्नईत ‘गिनीज बुक’ विक्रम

एकाचवेळी एक हजार विद्यार्थ्यांचा जीवशास्त्राचा वर्ग घेण्याचा ‘गिनीज बुक’ विक्रम येथील अण्णा विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय विज्ञान मंत्रालय व विज्ञान भारती या दोन संस्थांनी नोंदवला.

गेल्यावर्षी अशाच प्रकारचा विक्रम रसायनशास्त्राच्या पाठ वर्गासाठी नोंदवला गेला होता. केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम राबवण्यात आला. विज्ञान भारतीचे सरचिटणीस जयकुमार यांनी सांगितले की, जीवशास्त्राचा हा सर्वात मोठा पाठय़क्रम येथे यशस्वी करण्यात आला.

मुलांमध्ये विज्ञानाची गोडी वाढावी यासाठी हा उपक्रम घेण्यात आला. यात मुलांची संख्या, अध्यापनाची अचूकता, प्रयोग, वेळ या सर्व बाबींचे मूल्यमापन केले जाते. गिनीज बुक विक्रमाचा हा उपक्रम यशस्वी झाल्यानंतर गिनीज बुकच्या अधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री हर्षवर्धन व विज्ञान भारतीचे जयकुमार यांना विक्रमाचे प्रमाणपत्र प्रदान केले. शिक्षक व विद्यार्थ्यांनाही सहभागाची प्रमाणपत्रे देण्यात आली. चेन्नईतील वीस शाळांचे १०४९ विद्यार्थी यात सहभागी होते.

चेन्नईच्या श्री शंकरी सीनियर सेकंडरी स्कूलच्या शिक्षिका एम. लक्ष्मी यांनी पेशी ते डीएनए वेगळा करणे (सेल टू डीएनए स्पूिलग) या विषयावर सुमारे दीड तास मुलांना रोजच्या व्यवहारातील उदाहरणे देत विषय सोपा करून सांगितला. विद्यार्थ्यांनी यावेळेस अनेक शंका विचारल्या. त्याला श्रीमती लक्ष्मी यांनी उत्तरे दिली.

मुलांनी अतिशय चोखंदळपणे या वर्गाचा आनंद लुटला. श्रीमती लक्ष्मी यांना शारदा शिवकुमार व पद्म प्रिया यांनी मदत केली. या धडय़ात पेशींची रचना, जीवाणू, विषाणू यांची माहिती देण्यात आली. प्रथिने, डीएनए व आरएनए, प्रतिजैविके यांची माहिती देण्यात आली. आकृत्यांसह कठीण संकल्पना सोप्या करून लक्ष्मी यांनी विद्यार्थ्यांना खिळवून ठेवले.

स्वप्नील डांगरेकर यांनी गिनीजच्या वतीने विक्रमाची नोंद झाल्याचे जाहीर करताच मुलांनी आनंदाने जल्लोष केला. मुलांना विषय समजतो की नाही, त्यांचे वर्गाकडे लक्ष आहे की नाही यावर शिक्षक देखरेख करीत होते.

श्रीमती लक्ष्मी यांनी सांगितले की, ऑगस्ट महिन्यापासून त्यांनी या वर्गाचा सराव केला होता. विषयाची निवड काही प्राध्यापकांच्या सल्ल्याने केली होती.

डीएनए वेगळा करण्याची पद्धत

डीएनए वेगळा करण्याची पद्धत लक्ष्मी यांनी मुलांना सांगितली. त्यानुसार जर आपण पपईचा रस घेतला व त्यात जरासे डिर्टजट मिसळून त्या मिश्रणात थंड इथॅनॉल टाकले तर वरती जो अवक्षेप तरंगतो ते डीएनए असतात. लाळेच्या मदतीनेही हा प्रयोग करून आपण आपलेच डीएनए वेगळे काढू शकतो अशी सोपी युक्ती लक्ष्मी यांनी पाठात विशद केली.