ब्रिटनमध्ये फायझरच्या कोविड १९ प्रतिबंधक लशीस परवानगी देण्यात आल्यानंतर आता त्या देशाच्या इतिहासातील सर्वात मोठय़ा कोविड लसीकरण कार्यक्रमास मंगळवारपासून सुरुवात होत आहे. त्यात राष्ट्रीय आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना पहिल्यांदा ही लस देण्यात येणार आहे.

लशीच्या कुप्या बेल्जियम या शेजारच्या देशातून आल्या असून त्या शीतगृहांमध्ये साठवण्यात आल्या आहेत. आरोग्य कर्मचारी व ८० वर्षांवरील व्यक्ती यांना पहिल्या टप्प्यात लस दिली जाईल, हे लसीकरण मंगळवारपासून सुरू होत आहे. दी मेडिसीन्स अँड  हेल्थकेअर प्रॉडक्टस रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी या संस्थेने लशीला परवानगी दिली असून फायझरची लस ९५ टक्के प्रभावी ठरल्याचे दिसून आले आहे.

ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांनी सांगितले की, येत्या आठवडय़ात लसीकरण सुरू होणार असून तो ऐतिहासिक क्षण असेल. सर्वानी विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी नियमांचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले. पहिल्या टप्प्यात पन्नास निवडक ठिकाणी लसीकरण केले जाणार असून अनेक रुग्णालयात हे काम  सुरू केले जाणार आहे. त्यात वृद्ध व आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणात प्राधान्य असेल.

राणी एलिझाबेथ यांना लस

राणी एलिझाबेथ द्वितीय (वय ९४) यांच्यासह राज घराण्यातील वृद्ध व्यक्तींना लस दिली जाईल. फायझरची लस २१ दिवसांच्या अंतराने दोन मात्रात दिली जाणार आहे. सोमवारी लशीच्या कुप्या अनेक रुग्णालयांत पोहोचतील असे एनएचएसचे राष्ट्रीय वैद्यकीय संचालक प्रा. स्टीफन पॉविस यांनी सांगितले. पुढील आठवडय़ात लशीच्या आठ लाख कुप्या उपलब्ध होणार असून सरकारने ४ कोटी कुप्यांची मागणी नोंदवली आहे. त्यातून २ कोटी लोकांना लस देता येईल कारण त्याच्या दोन मात्रा अपेक्षित आहेत. ब्रिटनमध्ये करोना बळींची संख्या ६१ हजारावर गेली आहे.