वैज्ञानिकांनी लेसर पॉइंटर पेक्षा ६० हजार अब्ज इतक्या जास्त तीव्रतेच्या लेसर किरणांचा वापर करून प्रयोगशाळेत नवतारा निर्मिती स्फोट घडवून आणले असून त्यामुळे विश्वाच्या जन्मावेळच्या अतिऊर्जेच्या क्षणांचे संशोधन करता येणार आहे. ताऱ्यातील इंधनाचा जेव्हा पुन्हा स्फोट होतो तेव्हा त्याचे केंद्रक कोसळते व अंतराळातून काही प्रकाशवर्षे अंतरापर्यंत स्फोट झालेल्या ताऱ्यातील ऊर्जा पसरत जाते.
ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी हे संशोधन केले असून सुपरनोव्हा स्फोट प्रयोगशाळेत घडवून आणले आहेत. एका छोटय़ाशा खोलीतील टेबलावर  खगोल भौतिकीय पदार्थाचा अभ्यास करण्यासाठी असे स्फोट घडवून आणता येतात हे ऐकून कुणालाही आश्चर्य वाटेल, पण आम्ही ते प्रायोगिक पातळीवर घडवून आणले आहे. प्रत्यक्षात भौतिकशास्त्राचे नियम सर्वत्र सारखे असून बादलीतील पाण्याच्या लहरींची तुलना महासागरातील लहरींशी करता येते तसेच या प्रयोगातील निरीक्षणांचा वापर सुपरनोव्हा स्फोट म्हणजे कॅसियोपिया परिणामाच्या अभ्यासासाठी करता येईल, असे ग्रेगरी यांनी सांगितले.
 कॅसियोपिया हा सुपरनोव्हाचा स्फोट ३०० वर्षांपूर्वी कॅसिओपिया (कश्यपी तारकासमूह) तारकासमूहात ११००० प्रकाशवर्षे दूर अंतरावर दिसला होता.