अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील दहशतवादी गटांमुळे तेथे असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्रीय हितसंबंधांना बाधा येत आहे, असे मत अमेरिकेच्या दहशतवादविरोधी पथकातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. त्याच वेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारू नयेत यासाठी लष्कर-ए-तय्यबा या अतिरेकी संघटनेकडूनच प्रयत्न केले जात असल्याचा आरोपही या अधिकाऱ्यांनी केला.
लष्कर-ए-तय्यबाचे अनेक अतिरेकी भारत आणि अमेरिका ही पाकिस्तानविरोधी राष्ट्रे असल्याचा वल्गना करीत फिरत असतात. ही दोन्ही राष्ट्रे पाकिस्तान अस्थिर करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा आरोप हे अतिरेकी करतात, मात्र प्रत्यक्षात त्यांचाच भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्यास विरोध आहे, असा आरोप अमेरिकेच्या राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्राचे उपसंचालक निकोलस रासम्युस्सेन यांनी केला.
अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेतर्फे चालविण्यात येणाऱ्या या केंद्रातर्फे येथील लोकप्रतिनिधींना अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या देशांमधील सद्य:स्थितीची माहिती देण्यात आली. सिनेटमधील ‘होमलँड सिक्युरिटी’विषयक समितीसमोर रासम्युस्सेन यांनी काही मुद्दे तपशीलवारपणे मांडले.
पाश्चिमात्य राष्ट्रांच्या हितसंबंधांवर लष्कर-ए-तय्यबाचे अतिरेकी वारंवार घाला घालतात. त्यासाठी पाश्चिमात्य देशांमधील नागरिक उतरलेल्या पंचतारांकित हॉटेल्सना लक्ष्य करण्यात येते. २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांवरून ही पद्धती सहज लक्षात येते, असे रासम्युस्सेन यांनी स्पष्ट केले.
मात्र अमेरिकेवर हल्ला केल्यास त्याचे पडसाद पाकिस्तानची निंदा करण्याने उमटतात आणि यामुळे आपल्या पाकिस्तानातील ‘सुरक्षित अभयारण्यास’ धक्का बसू शकतो असे अलीकडे त्यांच्या लक्षात येऊ लागले आहे, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले, मात्र यावर उपाय म्हणून त्यांनी पाकिस्तान आणि पाश्चिमात्य देशांचेच नागरिक असलेल्या अतिरेकी गटांना विशेष प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे, ज्यायोगे लष्कर-ए-तय्यबाच्या आदेशाशिवायही हल्ले केले जातात, अशी माहिती सिनेट सदस्यांना देण्यात आली.