लष्कर-ए-तोयबा हे दहशतवाद्यांचे जाळे असून त्याला पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय खतपाणी घालत आहे. त्यामुळे यापुढे अमेरिकेवर लष्कर-ए-तोयबाकडून दहशतवादी हल्ला झाल्यास त्याची जबाबदारी पाकिस्तानवर राहील, असा इशारा अमेरिकेतील ज्येष्ठ काँग्रेसजन पीटर किंग यांनी दिला आहे.
लष्कर-ए-तोयबा आणि आयएसआय यांच्यात लागेबांधे असल्याने यापुढे आमच्या मातृभूमीवर लष्कर-ए-तोयबाकडून कोणताही दहशतवादी हल्ला झाल्यास त्याची जबाबदारी पाकिस्तानवर राहील, असे पाकिस्तानकडे स्पष्ट करण्याची गरज आहे, असेही किंग यांनी म्हटले आहे.
अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रसंघाने लष्कर-ए-तोयबा ही दहशतवादी संघटना असल्याचे स्पष्ट केले आहे. लष्कर-ए-तोयबा ही पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयचीच एक छुपी संघटना असल्याचा आरोपही किंग यांनी केला आहे.
किंग हे न्यूयॉर्कमधील रिपब्लिकन नेते असून ते मातृभूमी सुरक्षा समितीच्या दहशतवाद प्रत्युत्तर आणि गुप्तचर उपसमितीचे अध्यक्षही आहेत. काश्मीरच्या प्रश्नावर लष्कर-ए-तोयबाने निष्पाप भारतीय नागरिकांची हत्या केली आहे आणि आता या संघटनेने आपला विस्तार परदेशातही केला आहे, असेही ते म्हणाले.
लष्कर-ए-तोयबाचे जाळे संपूर्ण दक्षिण आशियात आणि पर्शियाच्या आखातात त्याचप्रमाणे ब्रिटन, कॅनडा आणि न्यूझीलंड येथेही पसरले आहे. अमेरिकेच्या भूमीचाही आता ते वापर करू लागले असून, अलीकडेच म्हणजे २०११ मध्ये व्हर्जिनियात झुबेर अहमद याला झालेल्या अटकेवरून ते सिद्ध होत आहे, असेही किंग यांनी नमूद केले.

तोयबा, अल कायदा आणि आयएसआय
लष्कर-ए-तोयबा ही आयएसआयचीच छुपी संघटना असून आयएसआयच लष्कर-ए-तोयबाला पाकिस्तानात आश्रय देत असून, दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यासाठी निधीही उपलब्ध करून देत आहे आणि याची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे, असेही किंग म्हणाले. तसेच तोयबाचे अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे अफगाणिस्तानात स्पष्ट झाल्याचेही त्यांनी नमूद केले.