पाकिस्तानातील लष्कर- ए- तोयबा या दहशतवादी संघटनेचा नेता अब्दुल रहमान मक्कीने शीखांचे पहिले गुरु गुरु नानक देव यांचा अपमान केला आहे. गुरु नानक देव हे भारतासह जगभरातील शीख धर्मियांचे श्रद्धास्थान आहेत. मक्की भारताला हवा असलेला मोस्ट वाँटेड दहशतवादी हाफिज सईदचा मेहुणा आहे तसेच लष्कर-ए-तोयबामध्ये तो दुसऱ्या क्रमांकाचा नेता आहे. पाकिस्तानातील मुल्तान शहरात एका कार्यक्रमात बोलताना त्याने गुरु नानाक देव यांच्याबद्दल अपमानास्पद भाषा वापरली.

अब्दुल रहमान मक्कीचे हे विधान म्हणजे पाकिस्तानात राहून भारताविरोधात दहशतवादी कारवाया करणाऱ्या शीख दहशतवाद्यांसाठी एक चपराक आहे. निदान आता तरी त्यांचे डोळे उघडले पाहिजेत. आज अनेक शीख दहशतवाद्यांनी पाकिस्तानात आश्रय घेतला आहे.  इस्लामची बदनामी करण्याचे कारस्थान गेल्या अनेक शतकांपासून सुरु आहे. शीखांचे पहिले गुरु गुरु नानक हे सुद्धा या कारस्थानामध्ये सहभागी होते ते सुद्धा इस्लामची बदनामी करण्यामध्ये समान गुन्हेगार आहेत असे वादग्रस्त विधान मक्कीने मुल्तानमध्ये लष्करच्या समर्थकांसमोर बोलताना केले. मक्कीने त्याच्या भाषणात शीख समाज, त्यांचा विश्वास आणि विचारधारा याबद्दल अत्यंत अपमानास्पद शब्द वापरले तसेच शिखांवर इस्लामविरोधात कट रचल्याचा आरोप केला.

३५० वर्षांपूर्वी कोणीतरी बाबा नानक देव म्हणून अवतरले. त्यांची शिकवण इस्लामच्या शिकवणीसारखी वाटल्याने मुस्लिम समाजातील मौलवी आणि विचारवंतांना त्यांच्याबद्दल आकर्षण निर्माण झाले असे मक्कीने म्हटले. ३५० वर्षांपूर्वी हिंदुंनी इस्लामविरोधात अत्यंत वाईट मुस्लिमांना कमकुवत करण्याचा कट रचला. गुरु नानकचं या कटाचे सूत्रधार होते असे वादग्रस्त वक्तव्य मक्कीने केले. शीख बेईमान, घोटाळेबाज आणि इस्लामविरोधी आहेत असे वक्तव्य मक्कीने केले आहे.

राय भोई की तालवांडी येथे १४६९ साली गुरु नानक यांचा जन्म झाला. शीख समाजाचे ते संस्थापक असून ते पहिले शीख गुरु आहेत. सध्या काही हजार शीख पाकिस्तानमध्ये राहतात. बहुसंख्य शीख आज भारतामध्ये राहतात. १९४७ साली फाळणीच्यावेळी पाकिस्तानातून मोठया प्रमाणावर शीख भारतात आले.