‘लष्कर- ए- तोयबा’ या दहशतवादी संघटनेने आता नवीन मोबाईल फोनची निर्मिती केली असून हे फोन ट्रेस करता येणार नाही. भारतीय सैन्याने कुपवाडा येथून अटक केलेल्या दहशतवाद्याच्या चौकशीतून हा खुलासा झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुरक्षा दलांनी एप्रिलमध्ये कुपवाडा येथून झैबुल्लाह उर्फ हमझा या दहशतवाद्याला अटक केली होती. २० वर्षांचा झैबुल्लाह हा मूळचा पाकिस्तानचा असून त्याचे वडील पाकमधील आयकर विभागात अधिकारी आहेत. झैबुल्लाह आणि त्याचे पाच साथीदार पाकव्याप्त काश्मीरमधून मार्चमध्ये भारतात आले. २० मार्च रोजी झालेल्या चकमकीत त्याचे पाच साथीदार मारले गेले. या चकमकीत झैबुल्लाह देखील जखमी झाला. पण तिथून पळ काढण्यात तो यशस्वी झाला होता. अखेर ७ एप्रिल रोजी तो सुरक्षा दलांच्या जाळ्यात अडकला. झैबुल्लाहची राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली असता त्याने काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

लष्कर- ए- तोयबाने दहशतवादी कारवायांसाठी आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरु केल्याचे झैबुल्लाहने सांगितले. ‘लष्कर’ने स्वत: मोबाईल फोन तयार केले असून हे मोबाईल फोन ट्रेस करता येत नाही. तसेच या फोनमध्ये एक चिप टाकल्यावर मोबाईलपासून जवळ जो टॉवर असेल त्याचं नेटवर्क पकडेल. या आधारे फोनवरुन कॉल करणे शक्य होईल. गुप्तचर यंत्रणांनी हा कॉल टॅप करण्याचा प्रयत्न केला तर तो कॉल कट होऊन जाईल, अशी माहिती झैबुल्लाहने दिली आहे. एनआयएने ही माहिती गुप्तचर यंत्रणांना दिली असून याबाबत अधिक माहिती घेतली जात आहे, असे सूत्रांनी सांगितले.

बुरहान वानी आणि दहशतवाद्यांची भरती
२० वर्षांचा झैबुल्लाह २०१७ मध्ये ‘लष्कर’मध्ये सामील झाला. पाकिस्तानच्या कानाकोपऱ्यातून जवळपास ४५० तरुणांना ‘जिहाद’साठी संघटनेत सामील करुन घेण्यात आले. दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण तळावर आलेली मुले १५ ते २५ वर्षे या वयोगटातील होती, अशी माहिती झैबुल्लाहने दिली. बुरहान वानीचा दाखला देत या तरुणांची माथी भडकवली जात होती आणि त्यांचे ब्रेन वॉ़श केले जात होते, असे चौकशीतून उघड झाले आहे. ‘लष्कर’च्या तळावर झकीऊर रेहमान लख्वी हा देखील आला होता, असे त्याने एनआयएच्या अधिकाऱ्यांना  दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lashkar e taiba student wing developed untraceable mobile captured terrorist zaibullah interrogation
First published on: 23-05-2018 at 11:55 IST