जम्मू- काश्मीरमध्ये सीमा रेषेवरुन ‘लष्कर-ए- तोयबा’च्या संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) दहशतवाद्याला दिल्लीतील विशेष न्यायालयासमोर हजर केले असून त्याला १० दिवस एनआयएच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

उत्तर काश्मीरमधील हंदवाडा येथून सैन्याने २४ नोव्हेंबर रोजी एका संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेतले होते. मोहम्मद आमीर अवान असे दहशतवाद्याचे नाव आहे. २१ नोव्हेंबर रोजी ‘लष्कर’च्या दहशतवाद्यांमध्ये आणि सैन्यामध्ये चकमक झाली होती. या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. तर एक जवान शहीद झाला होता. या चकमकीच्या पार्श्वभूमीवर सैन्याने ही कारवाई केली होती.

संशयित दहशतवाद्याला मंगळवारी एनआयएने ताब्यात घेतले. एनआयएच्या पथकाने दहशतवाद्याला दिल्लीतील विशेष न्यायालयाच्या न्यायमूर्ती पुनम बंबा यांच्यासमोर हजर केले. दहशतवाद्याची चौकशी करायची असून त्याला १० दिवस एनआयएच्या कोठडीत ठेवावे, असे एनआयएच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. यानंतर न्यायमूर्तींनी त्या दहशतवाद्याला १० दिवस एनआयएच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. मोहम्मद आमीर अवान असे दहशतवाद्याचे नाव असून तो ‘लष्कर’मध्ये अबू हमाज या नावाने ओळखला जायचा. मोहम्मद हा मूळचा कराचीचा असून त्याने पाकमध्ये ‘लष्कर’च्या तळावर प्रशिक्षण घेतले होते, अशी कबुली दिली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधून त्याने जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी केली होती. त्याच्या चौकशीत एनआयएला पाकिस्तानमधील ‘लष्कर’च्या तळांबाबत महत्त्वाची माहिती मिळू शकेल.