उत्तर प्रदेशातील कृष्ण जन्मस्थळ, वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिर, हापूड आणि सहारनपूर रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेकडून देण्यात आली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांना याबाबतचे एक पत्र मिळाले आहे. त्यामुळे राज्यात हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. या पत्रानुसार, ८ आणि १० जून रोजी या प्रमुख ठिकाणांवर बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली आहे. या पत्राची सत्यता सध्या पडताळण्यात येत आहे.

गुप्तचर यंत्रणेकडून (आयबी) हे पत्र मिळाल्यानंतर अॅलर्ट जारी करण्यात आला असून युपी पोलिसांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. अतिरिक्त पोलिस महानिरिक्षक आनंदकुमार यांनी सांगितले की, महत्वपूर्ण धार्मिक, पर्यटन आणि सार्वजनिक ठिकाणांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. एनडीटीव्हीने याबाबत वृत्त दिले आहे.

या पत्रावर जम्मू-काश्मीरच्या लष्करचा क्षेत्रीय कमांडर मौलाना अबू शेख याची सही आहे. याच दहशतवादी संघटनेने मंगळवारी बांदीपुरातील हाजिन सैन्यशिबिरावर हल्ला केल्याची जबाबदारी स्विकारली आहे. लष्करच्या एका प्रवक्त्याने अब्दुल्ला गजनवी याने श्रीनगरमधील एका वृत्त संस्थेशी फोनवरुन संपर्क करीत यामागे आपल्या संघटनेचा हात असल्याचा दावा केला आहे.

दरम्यान, अमरनाथ यात्रेदरम्यान दहशतवादी हल्ल्यामागे देखील लष्कर-ए-तोयबाचा हात होता. ही दहशतादी संघटना दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या दहशतवादी संघटनांपैकी एक आहे. हाफिज सईदने याची स्थापना अफगाणिस्तानातील कुनार प्रांतात केली होती. सध्या तो पाकिस्तानातील लाहोरमधून आपल्या चालवतो. तसेच पाकव्याप्त काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे चालवतो. या संघटनेने भारतात अनेकदा दहशतवादी हल्ले घडवून आणले आहेत.