कुख्यात अब्दुल करीम टुंडा आणि यासिन भटकळ या दोघा कडव्या अतिरेक्यांपाठोपाठ सोमवारी काश्मीर खोऱ्यात लष्कर ए तयबाचा मुख्य समन्वयक मन्सूर ऊर्फ शम्स भाई याला जेरबंद करण्यात सुरक्षा दलांना यश आले.
काश्मीरच्या बारामुल्लातील पट्टण भागात सुरक्षा दले व स्थानिक पोलिसांनी संयुक्त मोहिमेत शम्सची धरपकड केली. काश्मीर खोऱ्यातील अनेक घातपाती कारवायांत शम्सचा हात होता. गेली अनेक वर्षे तो उत्तर काश्मीरमध्ये कार्यरत होता. संघटनेतील त्याचे स्थान चौकशीदरम्यान अधिक स्पष्ट होणार आहे.
याआधी १६ ऑगस्टला अब्दुल करीम टुंडा याला तर २९ ऑगस्टला यासिन भटकळला पकडण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. भटकळच्या चौकशीतून मुंबईतील स्फोटात सामील असलेल्या वकास ऊर्फ अहमद ऊर्फ जावेद याचेही नाव पुढे आले असून तो भारतातच विद्यार्थी बनून उजळ माथ्याने वावरत असल्याचा भटकळचा दावा आहे. त्याचाही शोध सुरू आहे. त्याचबरोबर मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिमला पकडण्याच्या प्रयत्नांना अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे अधिक वेग येण्याचीही चिन्हे आहेत.
गेल्या काही महिन्यांत आम्ही अनेक दहशतवाद्यांना जेरबंद केले आहे तसेच काहींना कंठस्नान घातले आहे. दाऊद इब्राहीमच्या बाबतीत सांगायचे झाले तर त्याला पकडण्यासाठी आम्हाला अमेरिकेच्या मदतीची अपेक्षा आहे. यासाठी एफबीआय या अमेरिकेच्या गुप्तहेर संघटनेच्या आम्ही संपर्कात असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, असे शिंदे यांनी सांगितले. दाऊदवर यापूर्वीच रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
मुंबईत १९९३मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी भारताला दाऊद हवा असून अद्याप तो हाती लागलेला नाही. दाऊदला पाकिस्तानने आश्रय दिल्याचा दावा भारताने वारंवार केला आहे, पाकिस्तानने मात्र या दाव्याचे खंडन केले आहे.
कुख्यात गुंड दाऊद इब्राहीम याला अटक करण्यासाठी संयुक्त कारवाई करण्याचा प्रस्ताव केंद्राने अमेरिकेपुढे ठेवला आहे.
– सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय गृहमंत्री