कुलगाम जिल्ह्य़ात गुरुवारी रात्री भाजपच्या तीन नेत्यांची हत्या करण्यात आली त्यामागे लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे पोलीस महानिरीक्षक विजयकुमार यांनी सांगितले. ज्या व्यक्तींना संरक्षण देण्यात आले आहे त्यांनी सुरक्षेविना कोठेही फिरू नये, असे आवाहनही विजयकुमार यांनी केले आहे.

फिदा हुसेन, उमर हाजम आणि उमर रशीद बेग या भाजपच्या तीन कार्यकर्त्यांची गुरुवारी सायंकाळी दहशतवाद्यांनी वायके पोरा परिसरात गोळ्या घालून हत्या केली. या हत्येची जबाबदारी लष्कर-ए-तोयबाशी संबंधित असलेला गट ‘द रेझिस्टन्स फ्रण्ट’ने स्वीकारली आहे.

हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेली गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली असून अशा प्रकारची हत्या पाकिस्तानच्या इशाऱ्यावरून केली जाते, असेही पोलीस महानिरीक्षकांनी म्हटले आहे.

डॉ. अब्दुल्ला यांना रोखल्याचा दावा

श्रीनगर : नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूख अब्दुल्ला यांना जम्मू-काश्मीर प्रशासनाने हजरतबल प्रार्थनास्थळात ईदनिमित्त प्रार्थना करण्यासाठी जाण्याची परवानगी दिली नाही, असे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. हजरतबल प्रार्थनास्थळात जाण्याबाबतची सूचना डॉ. अब्दुल्ला यांनी दिली होती, मात्र त्यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा दले तैनात करून त्यांना प्रशासनाने रोखले, हे प्रार्थनेच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन आहे, असे पक्षाने म्हटले आहे.