मुंबई हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला फाशी दिल्यानंतरही त्याच्या नावाने लष्कर ए तय्यबाचा एक शिकवणीवर्ग नवोदित अतिरेक्यांसाठी चालतो. या वर्गात अजमल कसाबने काय चुका केल्या हे नवोदित अतिरेक्यांना त्यांच्या म्होरक्यांकडून समजून दिले जाते म्हणून त्याला ‘कसाब क्लास’ असे नाव पडले आहे.
लष्कर-ए-तय्यबाचा अटक करण्यात आलेला अतिरेकी महंमद जूट ऊर्फ अबू हांडला याच्या जाबजबाबातून ही बाब निष्पन्न झाली आहे. पाकिस्तानातील मुलतान येथील तो रहिवासी असून, दक्षिण काश्मीरमध्ये त्याला गेल्या महिन्यात अटक करण्यात आली.
जूट याने सांगितले, की त्याचे वडील निवृत्त लष्करी अधिकारी होते. तो व त्याचे भाऊ हे जमात उद दावाच्या मदरसाचा भाग होते. जूट हा पहिल्यांदा लष्कर-ए-तय्यबाचा अतिरेकी होता व तो कसाबला भेटला होता. कसाबला नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईत झालेल्या हल्ल्याप्रकरणी फाशी देण्यात आले होते. जूट याने दक्षिण काश्मीरमध्ये अनेक पोलिसांना ठार केले आहे. पाकिस्तानातील पंजाब प्रांतात मुलतान जिल्हय़ात बोरेवाला साहिवाला या लष्कर-ए-तय्यबाच्या छावणीत जूटने प्रशिक्षण घेतले. तिथे कसाब त्याला भेटला होता. कसाबचे वडील मदरशासाठी खाटिकाचे काम करीत होते. जूटने दिलेल्या माहितीनुसार कसाबला छावणीत प्रशिक्षण दिले जात होते तेव्हा तो गप्प असायचा. मुंबई हल्ल्याच्या अगोदर तर तो घुम्यासारखा वागत होता. लष्कर-ए-तय्यबाच्या प्रमुखांनी आता नवीन अतिरेक्यांना भरती करताना कसाबने केलेल्या चुकांचे ग्राफिक चित्रीकरण दाखवले.
२००९ मध्ये दौरा ए सुफा म्हणजे धार्मिक शिकवणीच्या वेळी मकसार अकसार छावणीत त्यांना या चुका सांगण्यात आल्या. कसाब व त्याचे साथीदार कुठे कमी पडले हे सांगण्यात आले. त्यांनी मुंबई किनाऱ्याकडे जाताना वापरलेली बोट नष्ट करायला हवी होती. सॅटेलाईट फोनवर बोलताना खरी ओळख उघड करायला नको होती. काही लोकांना ओलिस ठेवायला पाहिजे होते, अशा कसाब व साथीदारांच्या चुका या कसाब क्लासमध्ये सांगितल्या गेल्या. जूट हा पाचवी इयत्तेतून गळालेला विद्यार्थी उत्तर काश्मीरमधून ऑक्टोबर २०१२ मध्ये केरण मार्गे काश्मीरात आला. नंतर तो दक्षिण काश्मीरमध्ये गेला. २०१३ चा हिवाळा त्याने डचीगॅम जंगलात काढला. त्याच्याबरोबर लष्कर ए तय्यबाचे २१ अतिरेकी होते. पोलिसांना व निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांना ठार करण्याचे काम त्याला देण्यात आले होते. मे २०१३ मध्ये त्याने पुलवामा येथे एका पोलीस अधिकाऱ्यास ठार केले. जून २०१३ मध्ये लष्कराच्या छावणीवर झालेल्या हल्ल्यातही तो सामील होता. त्राल, शोपियाँ, कुलगाम या दक्षिण काश्मीरमधील भागात त्याने पोलीस गस्तीपथकांवर हल्ले केले. सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार वाच्छी शौकत गनी यांची हत्या करण्याचा कट त्याने आखला पण तो फसला. अटक होण्यापूर्वी तो पुलवामा येथे न्यायालयातील गोळीबारात सामील होता व २४ एप्रिल २०१४ रोजी त्याने निवडणूक पथकावर हल्ला केला होता.