भारतातील १६व्या लोकसभा निवडणुकांसाठीचा नवव्या आणि अंतिम टप्प्यातील प्रचार आज संपुष्टात आला. आतापर्यंत देशभरातील ५०२ लोकसभा मतदारसंघात आठ टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात आले आहे. लोकसभेच्या उर्वरित ४१ जागांसाठी येत्या १२ मे रोजी नवव्या आणि अंतिम टप्प्याचे मतदान होणार आहे. यामध्ये बिहारमधील सहा, उत्तप्रदेशातील १८ आणि पश्चिम बंगाल राज्यातील १७ लोकसभेच्या जागांचा समावेश आहे. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील प्रचाराचा शेवटच्या दिवसाचा मुहूर्त साधत सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. लोकसभेच्या दृष्टीने देशातील अत्यंत प्रतिष्ठेची लढत असलेल्या वाराणसी मतदरासंघात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी आज प्रचारयात्रांच्या माध्यमातून जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले. गेले अनेक दिवस सुरू असणाऱ्या प्रचाराच्या तोफा थंडावल्यामुळे आता संपूर्ण देशाचे १६ मे रोजीच्या लोकसभा निवडणुकांच्या निकालाकडे लागले आहे.
अंतिम टप्प्यात होणाऱ्या मतदान प्रक्रियेत देशातील अनेक दिग्गज उमेदवारांचे भवितव्य पणाला लागणार आहे. यामध्ये प्रामुख्याने भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी , आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल ,  जगदंबिका पाल, समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांचा समावेश आहे.