‘मोदींनी पंतप्रधान व्हावे अशी माझी इच्छा आहे,’ असे विधान करणाऱ्या गानकोकिळा लता मंगेशकर यांचे हे वक्तव्य काँग्रेसला चांगलेच झोंबले आहे. मोदींसारख्या असंवेदनशील व्यक्तीबद्दल लतादीदींसारख्या महान गायिकेने असे म्हणावे, हे अत्यंत दु:खद असल्याचे मत काँग्रेसच्या गोटातून व्यक्त करण्यात आले आहे.
‘देशात लता मंगेशकरांबद्दल आदराची भावना आहे. काँग्रेसनेही नेहमीच त्यांच्या भावनांचा सन्मान राखला आहे. त्यांच्या आवाजात एक प्रकारची संवेदनशीलता आहे. असे असताना त्यांनी मोदींसारख्या असंवेदनशील व्यक्तीबाबत केलेल्या वक्तव्यांनी संपूर्ण देशाला दु:ख झाले आहे,’ अशी प्रतिक्रिया काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते भक्त चरण दास यांनी दिली. लता राज्यसभेच्या सदस्या होत्या. मात्र त्यांची उपस्थिती राज्यसभेत अभावानेच दिसत होती. त्यांना राजकारणात जराही रस नाही. एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीबद्दल परमेश्वराकडे काय मागणे मागावे हा ज्याचा-त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण त्यांच्या या मताचा काही जण राजकीय उपयोग करू पाहात आहेत, हे मात्र गैर आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते मीम अफझल यांनी व्यक्त केली. नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणारे काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी या वेळी मात्र वेगळी भूमिका घेतली आहे. लता मंगेशकर या भारताचा मानबिंदू आहेत, आपली राजकीय मते व्यक्त करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. आपण त्यांच्या संगीतावर प्रेम करत राहूया, असे सिंग यांनी ट्विट केले आहे.
वास्तवाकडे लक्ष द्यावे
मोदी यांनी पंतप्रधान व्हावे असे वक्तव्य करणाऱ्या लता मंगेशकरांवर काँग्रेस चांगलीच नाराज झाली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसनेही ‘लताबाईंनी वास्तव जाणून घ्यावे आणि मगच आपले मत व्यक्त करावे,’ असा सल्ला दिला आहे. जर त्यांनी वास्तवाकडे लक्ष दिले तर त्यांना मोदींचा निधर्मीवाद आणि तथाकथित विकास कसा खोटा आहे हे लक्षात येईल आणि कदाचित त्या आपले मतही बदलतील, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने म्हटले आहे.

आंध्र प्रदेशात विचित्र रेल्वे अपघातात १० ठार
विजयनगरम् : रेल्वेच्या डब्यात आग लागली या अफवेमुळे घाबरून जीव वाचविण्यासाठी डब्यातील काही प्रवाशांनी गाडीतून खाली उडय़ा मारल्या. मात्र त्याच वेळी विरुद्ध बाजूने येणाऱ्या एक्स्प्रेसखाली त्यातील काही प्रवासी सापडले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एलप्पीहून (केरळ) धनबादकडे जाणाऱ्या एक्स्प्रेसच्या एका डब्याला आग लागली असल्याची आरडाओरड झाली. त्यामुळे काही प्रवाशांनी साखळी ओढली. आणि प्रवाशांनी आपला जीव वाचविण्यासाठी उडय़ा मारल्या. दुर्दैवाने त्याच वेळी विरुद्ध बाजूने रायगड (ओडिशा) – विजयवाडा एक्स्प्रेस येत होती. उडी मारणारे १० प्रवासी या गाडीखाली आले.